जून, जुलै कमी पावसाचे, ऑगस्टनंतर भरपूर पाऊस; खरिपाची पिके सर्वसाधारण; रब्बीत गहू चांगला होणार!
– राज्यात अतिवृष्टीची शक्यता, पिकांवर रोगराईची भीती, सप्टेंबरमध्ये अवकाळी पाऊस
– भेंडवळची घटमांडणी शेतकर्यांची निव्वळ दिशाभूल, लीलावती विद्या सिद्ध करा, ५० लाखांचे बक्षीस घ्या – अंनिसचे आव्हान
बुलढाणा (बाळू वानखेडे) – यंदा पाऊस चांगला होईल, तर खरीप पिके साधारण राहतील. याशिवाय रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, असा अंदाज जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील भाकणुकीतून वर्तविण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमंडणीचे बहुप्रतिक्षीत निष्कर्ष आज (दि.११) सकाळी सहा वाजता पुंजाजी महाराज वाघ यांनी जाहीर केलेत. लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राजकीय भाकीत मात्र टाळले गेले असून, ते २ जूननंतर जाहीर केले जाणार आहे. मात्र ‘राजा’ कायम राहण्याची धुसर शक्यता आहे. यंदा पानविडा कायम असला तरी किंचितसा कलंडला होता. त्यामुळे राजा कायम दिसत असला तरी तो हलू शकतो, असा अंदाज तेथे उपस्थितांनी व्यक्त केला आहे. वाघ महाराजांनी मात्र याबाबत काहीही राजकीय भाकित वर्तवले नाही.
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल. सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच सुरुवातीचे दोन महिने सामान्य पाऊस असेल. तर ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर करण्यात येणार्या या घटमांडणीतील या भाकितानुसार, पीकपाण्याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानुसार, जून, जुलै हे महिने कमी पावसाचे असणार आहेत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडेल. याबाबत माहिती देताना घटमांडणीमधील जाणकारांनी सांगितले की, घटमांडणीतील अंदाजानुसार, पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दिसत आहे. कुठे पडेल तर कुठे पडणार नाही. दुसरा महिनाही तशाच प्रकारचा आहे. पण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल. तिसरा महिना एकदम चांगला आहे. या महिन्यात सर्वत्र पाऊस पडेल. चौथा महिनाही सार्वत्रिक पावसाचा आहे. चौथ्या महिन्यामध्ये अवकाळीचा फटका शेतकर्यांना बसणार आहे. पिकांबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पिकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला तरी खरिपाची पिके साधारण राहतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचे पीक चांगले येईल. त्याशिवाय, काही पिकांवर रोगराईचा परिणाम होण्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी येथील घटमांडणीमधून राजकीय भाकित केले जाते. मात्र यावर्षी आचारसंहिता असल्याने तसे भाकित केले गेले नाही.
अक्षय्यतृतीयेला सायंकाळी घटमांडणी करण्यात येते. यावेळी घटामध्ये अंबाडी, कपाशी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ, भादली, बाजरी, मटकी, तांदूळ, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा, करडी आणि मसूर अशी अठरा प्रकारची धान्य गोलाकार मांडण्यात येतात. घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात येतात. आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारा-पाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात येतात. बाजूला खाणार म्हणजे चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात येते. तर घागरीच्या बाजूला राजा आणि राज्याची गादी म्हणजेच पान-सुपारी ठेवण्यात येतात. रात्रभर कुणीही या घटकाकडे फिरकत नाही. त्यानंतर आज सकाळी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करत त्यामध्ये रात्रीदरम्यान झालेल्या बदलावरून भाकीत वर्तविले जाते.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी निव्वळ शेतकर्यांची दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग आहे. लीलावती विद्येचा दावा खोटा असून, ही विद्या सिद्ध करणार्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २५ लाख व २५ लाख वैयक्तिक असे ५० लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे. कौलकर यांनी या घटमांडणीवर थेट आरोप करत त्याला थोतांड म्हटले आहे. मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भविष्यवाणी अनेक वेळा खोटी ठरलेली आहे. या घटमांडणीच्या आहारी जाऊ नये असे, आवाहन देखील रघुनाथ कौलकर यांनी केले आहे.
असे राहील पाऊसपाणी..
पाहिला महिना – पाऊस कमी, दुसरा महिना – चांगला पाऊस, तिसरा महिना – भरपूर पाऊस, चौथा महिना – अवकाळीसारखा दमदार पाऊस राहील. यावर्षी खरीप पिके साधारण राहतील, असे वाघ महाराजांनी सांगितले. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरभरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यावर रोगराई जास्त प्रमाण येईल व पिकांची नासाडी होईल. रब्बी पिकांमध्ये गहू सर्वात जास्त चांगले पीक राहील. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहणार आहेत. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरभरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडीदेखील होईल. याशिवाय, भावात तेजी-मंदी राहील. पृथ्वीवर संकटे नाहीत. तसेच भारताचे संरक्षण व्यवस्था मजबूत राहून शत्रूंच्या कुठल्याही कारवाया यावर्षी होणार नाहीत. देशाची आर्थिक परिस्थिती ही मजबूत असेल. चाराटंचाई जाणवणार नाही, असे भाकीत सांगण्यात आले आहे. घटमांडणीमध्ये यावर्षी पाण्याची घागर, सांडोळी, कुरडी, भजा, वडा, पापड, पुरी आणि पानसुपारी हे सर्व कायम असल्याने सर्व काही ऑलवेल असल्याचे पुंजाजी वाघ महाराजांनी सांगितले.