Breaking newsHead linesMaharashtraNAGARPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

नीलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी, मी त्या शाळेचा हेडमास्तर; यंदा तुझा कंड जिरवतोच, तू कसा खासदार होतो, ते बघतोच!

– माझ्या नादी लागणार्‍यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय, तू किस झाड की पत्ती?

पारनेर, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – ”अरे नीलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तुझा असा कंड जिरवेन, की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. यंदा तुझा कंड जिरवतोच, तू कसा खासदार होतो, ते बघतोच”, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे अध्यक्ष अजित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना पारनेर या लंकेंच्या बालेकिल्ल्यात येऊन दम भरला. महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ येथील बाजारतळावर आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक नेत्यांसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती होती.
पारनेरात जाऊन अजितदादांनी नीलेश लंकेंना भरला दम.

या जाहीर सभेतून अजित पवार यांनी नीलेश लंकेंवर घणाघाती टीका केली. पवार म्हणाले, की मागच्या वेळी नीलेशला तिकीट देऊन चूक झाली. अगोदर हा गरीब वाटला. नंतर समजलं हा गुंड पाठवून लोकांना त्रास देतो. कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप बनतो, नीलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्तर आहे. तू आता आमदार नसून, कॉमनमॅन झालाय. तुझा कंड कसा जिरवायचा हे मला चांगलं माहीत आहे. गडी दिसतो बारीक पण लई पोहोचलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर पहा. माझ्या नादी लागू नको, असा दमही यावेळी पवारांनी लंकेंना भरला. आपल्या भाषणात अजित पवारांनी नीलेश लंकेंना चांगलेच सुनावले. नीलेश माझ्या नादी लागू नकोस. महाराष्ट्रात जे कोणी माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय, मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यास तर मी तुझ्या मागे लागेन. ग्रामीण भागात एक शब्द आहे, कंड जिरवतो. तुझा असा कंड जिरवेन की तुला डोळ्यासमोर सारखा अजित पवार दिसेल. आता तो आमदार नाही, त्यामुळे त्याची अरेरावी अधिकार्‍यांनी सहन करु नये, आता कोणी अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहनही पवारंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. लोकसभा निवडणुकीत या नीलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही, लंकेचे पार्सल घरी पाठवण्याचे काम करायचं, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

आमदार झाल्यावर लक्षणं समजली…!

तुमच्यासाठी उमेदवारी दिली, मात्र वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकार्‍यांनादेखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकार्‍यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पठ्ठ्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय, अशी धमकी देतो. आचारसंहिता संपल्यावर मी अधिकार्‍यांची बैठक घेईन. आता तर तो आमदारही नाही. तो तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस झालाय. त्यामुळे त्याची अरेरवी आता अधिकार्‍यांनी सहन करू नये. आपल्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करू नये. मात्र कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका. निवडणूक आयोगालासुद्धा पारनेरमध्ये जास्त बंदोबस्त देण्याची आम्ही मागणी करणार आहोत. इथे प्रत्येक व्यावसायिकाला आणि डॉक्टरला बिल न घेण्यासाठी दादागिरी केली जाते हेसुद्धा मला समजलं. तुम्ही अजिबात घाबरू नका, महायुती आता तुमच्या पाठीशी आहे, असेही अजित पवार या सभेत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत या नीलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला होता व तो आपल्या पाठीशी आहे. आपल्या आमदाराने राजीनामा दिला आता कोण वाली हे समजू नका. पालकमंत्री विखे आता आपल्यासोबतच आहेत. महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता. इथले नगराध्यक्ष मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का? आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. ४ जूनला पेट्या उघडल्यावर हे लंकेचा पार्सल घरी पाठवण्याचं काम करा.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!