– रेतीमाफियांविरोधात धडक कारवायांसाठी चार पथके नियुक्त; रस्ते खोदले तरी रेतीतस्करांकडून रेतीचोरी सुरूच!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – खडकपूर्णा नदीपात्रातून वाळूतस्करी शेंदुर्जन येथे येणारे विनानंबर आणि कोणताही वाहतूक परवाना नसलेले रेतीचे टिप्पर महसूल विभागाच्या पथकाने ११ मेरोजी सकाळी जप्त केले, व वाळूतस्करांना चांगलाच दणका दिला. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रेतीतस्करांविरोधातला फास चांगलाच आवळला असून, त्यांना एकावर एक दणके देणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान, एक टिप्पर सोडून दिल्याचीही चर्चा परिसरात होती.
सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणार्या रेतीमाफियांविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी चार पथके नियुक्त केली आहेत. तसेच खडकपूर्णा नदीपात्रातील घाटाकडील सर्व रस्ते खोदून बंद केले होते. त्यानंतरही रेती माफियांनी रात्रीला जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार करून रेती उपसा सुरुच ठेवला आहे. पथकाला चकमा देऊन विनापरवाना आणि विनानंबर असलेले एक टिप्पर मेरा बुद्रूक ते दरेगाव रस्त्याने येत असल्याची माहिती पथक प्रमुख प्रमोद वानखेडे यांना मिळाली. त्यांनी ११ मे रोजी सकाळी सहा वाजता दरेगाव रस्त्याने येत असलेले टाटा कंपनीचे, पांढर्या रंगाची कॅबिन असलेले आणि करड्या रंगाची बॉडी असलेले टिप्पर अडविले. त्यात चार ब्रास रेती वाहतूक करताना आढळून आली. वाहन चालक प्रविण शिवाजी डोईफोडे रा. जागदरी यांची पथकाने चौकशी केली असता सदर वाहन हे देऊळगावमही येथील रामेश्वर बंडू गिते यांचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पथक प्रमुख प्रमोद वानखेडे, पटवारी प्रदीप मोगल, पंकज देशमुख यांनी पंचनामा करून रेतीसह टिप्पर जप्त केले आहे. रेती वाहतूकीसाठी आवश्यक असलेली कोणतेही कागदपत्रे नसल्याने टिप्पर जप्त करून पुढील कारवाईसाठी साखरखेर्डा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
————