नवी दिल्ली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. देशाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाची शपथ दिली. मुर्मू या देशाच्या द्वितीय महिला राष्ट्रपती व देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या त्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत.
शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील वरिष्ठ नेत्यांनी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर जात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करत अभिवादन केले. शपथविधीनंतर उपस्थितांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, की आपणास अभिमान वाटत आहे, की देशाच्या हीरकमहोत्सवी वर्षात देशाची सेवा करण्याचा सन्मान मिळत आहे. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली राष्ट्रपती ठरते आहे, याचाही आनंद आहे. राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचणे हे केवळ माझ्या एकटीचे श्रेय नाही, तर ते या देशातील प्रत्येक गरिबाचे ते श्रेय आहे. आम्हा आदिवासींना सामाजिक उत्थान व देश प्रेमासाठी ‘धरती आबा’ अर्थात भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळाली, असेही त्या म्हणाल्यात.द्रौपदी मुर्मू यांनी १८ जुलैरोजी झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता.
Leave a Reply