शेतकरी नेते रविकांत तुपकरांची यशस्वी शिष्टाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (एकनाथ माळेकर) – मातृतीर्थ सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमहामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी पेठ येथील पैनगंगा नदीपात्रात सुरू झालेले जलसमाधी आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी आंदोलनकर्त्यांसोबत तातडीची बैठक घेऊन शेतकर्यांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. त्यानंतर रविकांत तुपकर व चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन पहिल्याच दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. पैनगंगा नदीपात्रातील आंदोलनस्थळी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गबाधित शेतकर्यांनी बुधवारी (दि.१४) टोकाचा निर्णय घेत पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेतेही दिसून आल्याने या आंदोलनाला राजकीय वळण प्राप्त होते, की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. या प्रस्तावित महामार्गात ज्या शेतकर्यांच्या शेतजमिनी जात आहेत, ते भयभीत झाले असून, महामार्ग रद्दचा ठोस निर्णय होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. सिंदखेडराजा ते शेगाव महामार्गविरोधी कृती समितीच्यावतीने यापूर्वी प्रशासनाला वारंवार निवेदने देवून तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. सरकार गरज नसलेला महामार्ग बनवून आम्हाला भूमिहीन करीत आहे, आणि आमच्यावर विस्थापित होण्याची पाळी सरकारच्या या निर्णयामुळे येणार आहे. आपली वडिलोपार्जित जमीन डोळ्यासमोर कोणी हिसकावून घेत असेल व आमच्यावर भूमिहीन होण्याची, गाव सोडून जाण्याची वेळ जर येत असेल तर जगून तरी काय फायदा, अशा क्लेशदायक शब्दात शेतकरी भावना व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाला विरोध असेल तर राज्य सरकार या निर्णयावर फेरविचार करेल, असे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महामार्ग रद्द करण्यास काहीच अडचण नाही, त्याबाबत प्रशासनाने शेतकर्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे सांगितले आहे. या भागातील शेतकर्यांनीदेखील महामार्ग रद्द करावा, अशी निवेदने आणि हरकती तहसीलदार आणि जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांनी पवित्र अशा पैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस व प्रशासन या शेतकर्यांना आंदोलन करून नका, असे सांगतात. पण आमचे म्हणणे काही सरकारपर्यंत पोहोचवत नाहीत. आमच्या सनदशीर आंंदोलनाला मात्र रोखण्याचा प्रयत्न करतात, असे याप्रसंगी आंदोलकांनी सांगितले.
आजच्या या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते डॉ. ज्योतीताई खेडेकर, डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्यासह शेतकरी नेते देविदास कणखर, विनायक सरनाईक हेदेखील सहभागी झाले होते. तसेच, मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मनोज जाधव, महामार्गबाधित शेतकरी समाधान म्हस्के, मधुकर सपकाळ, सुनील अंभोरे, सागर आंभोरे, गणेश थिगळे, गजानन आंभोरे, गणेश दायजे, संतोष म्हळसणे, बंडू जाधव, अक्षय वाघ, सौ.वंदना सपकाळ, निर्मला दायजे, सिंधूताई म्हळसणे, गोकुळाबाई अंभोरे, शांताबाई सपकाळ, उध्दव थोरात, माधव तोरमल, संजय आंभोरे, राजू म्हस्के, विजय वाघ, अच्युतराव जाधव, तुळशीदास कणखर, बळीराम सपकाळ, संतोष शेळके, विष्णू शेळके आदी शेकडो शेतकरी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी पैनगंगा नदीपात्रात उतरले होते. चिखलीचे नायब तहसीलदार मुंडे, मंडळ अधिकारी शेळके आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा सुरू केली होती. तर अमडापूर ठाणेदार निर्मळ यांनी मोठ्या फौजफाट्यासह तगडा बंदोबस्त तैनात केला होता. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याप्रश्नी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून या आंदोलनाचे गांभीर्य त्यांना सांगितले, त्यामुळे पुढे वेगवान हालचाली होऊ शकल्या. शेवटी तहसीलदार संतोष काकडे व रविकांत तुपकर यांच्या माध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
‘अन्नत्याग’ आंदोलनानंतर विनायक सरनाईक ‘जलसमाधी’ आंदोलनात!