– अव्वल कारकुनाच्या कारभाराचा वाचला पाढा; चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकुनाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांच्या संपत्तीचीही एसीबीमार्फत उघड चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे.
सविस्तर असे, की सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी कार्यालयात शिवाजी पापुलवार हे अव्वल कारकून पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील शेतरस्त्यांसंदर्भात दिलेल्या आदेशांची तसेच त्यांच्याकडे असलेल्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी. गेल्या १५ वर्षांपासून पापुलवार हे अव्वल कारकून म्हणून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. सिंदखेडराजा येथेच सिंदखेडराजा तहसील ते पुन्हा सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालय अशा त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे तब्बल १५ वर्षे ते एकाच शहरात असल्याने त्यांचे काही ठरावीक व्यक्तींशी सलोख्याचे संबंध निर्माण झालेले आहेत. त्यातून त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केल्याचाही संशय आहे. शिवाय, त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात संपत्तीही असल्याची चर्चा होत असते. गेली १५ वर्षे त्यांची सिंदखेडराजा शहराबाहेर बदली झाली नाही. त्यांच्याकडे असलेले अपंग प्रमाणपत्रामुळे त्यांची बदली झाली नसल्याचे कळते आहे. त्यामुळे या अपंग प्रमाणपत्राची तर चौकशी व्हावीच, पण त्यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. शिवाय, त्यांच्या १५ वर्षातील कार्यकाळाची खातेनिहाय व त्यांच्या मालमत्ता व संपत्तीची एसीबीमार्फत खुली चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल दराडे व इतरांनी केली आहे. अन्यथा, उपोषणाचा इशाराही देण्यात आलेला आहे.