BULDHANAChikhaliHead linesVidharbha

‘अन्नत्याग’ आंदोलनानंतर विनायक सरनाईक ‘जलसमाधी’ आंदोलनात!

– भक्ती महामार्गरद्दची घोषणा होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – सिंदखेडराजा ते शेगाव हा प्रस्तावित भक्ती महामार्ग रद्द करण्याबाबत राज्यातील महायुती सरकार सकारात्मक असताना, आणि सद्या या महामार्गाचे काम थांबवले गेले असताना, महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी हा महामार्ग रद्द करण्याची अधिकृत घोषणा करण्याच्या मागणीसाठी आजपासून पेठजवळील पैनगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकरीदेखील सहभागी झालेले आहेत. महामार्ग रद्द करण्यासंदर्भात जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाआघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.

भक्ती महामार्ग रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विनंतीवरून राज्य सरकारने नुकतीच उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत हा महामार्ग रद्द करण्याबाबत राज्य सरकार तयार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. तथापि, याच भागातील काही शेतकर्‍यांनी हा महामार्ग व्हावा, अशी मागणी केली असून, तसे निवेदन शासनाला दिलेले आहे. अन्यथा, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार द्विधा मनस्थितीत पडलेले आहे. याप्रश्नी महसूल प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या भूमिका ऐकून अहवाल पाठविण्याचे आदेशही फडणवीस यांनी महसूल सचिवांना या बैठकीत दिले होते. केवळ श्वेताताई महाले पाटीलच नाही तर सिंदखेडराजाचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी लेखीपत्राद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. असे असतानाही महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा महामार्ग रद्द करण्याबाबत आंदोलनाची भूमिका घेऊन महामार्गविरोधी कृती समितीचा हा मुद्दा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.


दरम्यान, आज सकाळपासून पेठ येथील पैनगंगा नदीपात्रात सत्येंद्र भुसारी, ज्योतीताई खेडेकर या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शेतकर्‍यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले असून, जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे. तसेच, जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही दिला आहे. या आंदोलनात शेतकरी नेते विनायक सरनाईक, देवीदास कणखर यांच्यासह गणेश बरबडे, समाधान म्हस्के, मधुकर सपकाळ यांच्यासह इतरही सहभागी झाले आहेत. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाच्यावतीने आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, तसेच आंदोलकांच्या जीविताची काळजी घेता, हे आंदोलन योग्यरितीने हाताळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!