महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर केंद्रातील मोदी सरकार बदलण्याचं वारं इथूनच सुरू होईल!
– काँग्रेसला जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न, पण महाआघाडी टिकवणेही आपलीच जबाबदारी!
– ओरबडे, चिमटे, अन् हेव्यादाव्यांनी गाजली बुलढाणा जिल्ह्याची विधानसभापूर्व निवडणूक आढावा बैठक!
– शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवाराचे काम करूनही पराभवाचे ‘खापर’ फोडल्याच्या जखमाही ‘भळभळल्या’!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, त्यामुळे हेवेदावे चालतच असतात, असे असले तरी कार्यकर्त्यांमुळेच पक्ष जीवंत आहे, हेही तेवढेच खरे. त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करा. महाराष्ट्रात सत्ता आली की, केंद्रातील मोदींचे जुलमी सरकार घरी गेल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते तथा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केला. महाविकास आघाडीत छोटा, मोठा असा भेदभाव नसला तरी निश्चितच जास्त जागा पदरात पडून घेण्याचा आपला प्रयत्न राहील, परंतु महाविकास आघाडी टिकवणेसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, असेही सांगत त्यांनी नेत्यांचे कानही टोचले. जिल्ह्यात पीकविमा, शेतकर्यांना दिवसा वीज, सोयाबीन प्रोसेसिंग युनिट, सिंदखेडराजा, लोणार व शेगाव येथे टुरिझम यासह इतरही अनेक समस्या असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले असून, याबाबत आंदोलन उभे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी जिल्हा काँग्रेसला दिले.
बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात काल, दि.१३ ऑगस्टरोजी वाशिम, अकोलासह बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश चेन्निथला बोलत होते. विशेष म्हणजे, चिमटे, ओरबडे, अन् हेवेदाव्यांनी ही बैठक चांगलीच गाजल्याचे दिसले. तर लोकसभेत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराचे मित्रपक्ष या नात्याने इमाने इतबारे काम करुनही पराभवाचे ‘खापर’ फोडल्याने झालेल्या ‘जखमा’ही या बैठकीत भळभळतांना दिसून आल्या. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री अंनिस अहमद, जिल्हा प्रभारी नाना गावंडे, मदन भरगड, संजय राठोड, आ.राजेश एकडे, आ.धीरज शिंगाडे, जयश्री शेळके, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, प्रदेश सचिव दादुशेठ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते. दिल्लीत काँग्रेसची मिटींग असल्याने खा.मुकूल वासनिक व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले मात्र बैठकीला गैरहजर होते.
केंद्रातील सरकार बदलण्यासाठी महाराष्ट्र राज्याने नेहमीच महत्वाची भूमिका निभावली आहे, चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांच्या कुबड्या घेवून स्थापना झालेलं वसूलीबाज, श्रीमंतांच मोदी सरकार बदलवायचं असेल आणि जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करायचं असेल तर महाराष्ट्रात सत्ताबदल होणं फार गरजेचं आहे आणि ती ताकद महाराष्ट्राच्या जनतेत आहे,हे महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलंय.. आता प्रतीक्षा विधानसभेची!
– रमेश चेन्निथला
सुरुवातीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्हा काँग्रेसचा लेखाजोखा सादर केला. यामध्ये जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून, २२६६ बुथ शिवाय २ हजार बीएलए आहेत. मलकापूर, चिखली, खामगाव येथील बुथचे काम पूर्ण झाले असून, मेहकरसह इतर तालुक्यांतील बुथचे काम ७० टक्के झाल्याचे त्यांनी सांगितले. खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकदच नाही, त्यामुळे बहुतांश मतदारसंघ काँग्रेसला सोडा, शिवाय निष्ठावंतांनाच तिकीट द्यावे, आम्ही त्याचे इमानदारीने काम करू, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे पाहूनच ‘सीrट शेअरिंग’ व्हावे, अशी अपेक्षा यावेळी मलकापूरचे आ.राजेश एकडे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात काँग्रेसची हालत ठीक नाही, शिवाय मतभेदही वाढत आहेत. विरोधात काम करणारे नेहमीच पुढे असतात, चुकीला चूक म्हणण्याचे कोणीही धाडस करत नाही, शिवाय पीसीसीचा डीसीसीमध्ये हस्तक्षेप वाढल्याचा थेट आरोप यावेळी देशपातळीवर संघटनेचे काम करणारे, बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यावेळी त्यांचा रोख जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकार्यांवर असल्याचे जाणवले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महिलांना संधी द्यावी, अशी मागणी यावेळी प्रदेश सचिव स्वाती वाकेकर यांनी केली. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर हे चांगलेच पोटतिडकीने बोलल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेना (टाकरे) पक्षाचे विशेषतः ग्रामीणमध्ये कोणतेच संघटन नाही, मित्रपक्ष या नात्याने आम्ही उरापोटावर घेऊन लोकसभा निवडणुकीत काम केले अन् करतोही, विशेषतः मेहकर विधानसभा मतदारसंघात सेनेचे खा. प्रतापराव जाधव असतानाही नरेंद्र खेडकर यांना अवघे २७३ मतेच कमी पडले, असे असतानाही पराभवाचे ‘खापर’ मात्र आमच्या ‘माथी’ फोडल्या जात असून, पक्षाकडून काही मिळाले नाही तरीही आम्हालाच कटघरात उभे केल्या जाते, अशी खंतही व्यक्त केली. अनुसूचित जातींसाठी राखीव मेहकर विधानसभा मतदारसंघातही ठाकरे गटाचे संघटन नाही अन् सक्षम उमेदवारही दिसत नाही, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना (ठाकरे) देऊच नये, तो काँग्रेसलाच सोडावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी जोरात रेटली. मुस्लीम समाजाने लोकसभेत ताकदीने काम केले, त्यामुळे त्यांचाही विचार व्हावा, असेही ते म्हणाले.
पक्षाची उमेदवारी देताना विशेषतः राखीव जागावर काँग्रेसचाच उमेदवार असला पाहिजे, शिवाय एससी, एसटीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तिकिटाचे वाटप व्हावे, अशी सूचना यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी मांडत, सोशल सोशल इंजिनिअरिंग आहे, हे नुसते सांगून होणार नाही तर त्या दृष्टीने वाटचालदेखील करावी लागेल. संघटना आहे तर मग पराभव कसा? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आम्हाला कोणीही वाली नाही. आम्हाला कामासाठी साधेपत्रही भेटत नाही. त्यामुळे हा मतदारसंघ आता काँग्रेसला सोडावा, अशी पोटतिडकीने मागणी शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी यावेळी केली. प्रदेश सचिव गणेश पाटील, आ.धीरज लिंगाडे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अलका खंडारे, अनंत वानखेडे, लक्ष्मणराव घुमरे, साहेबराव पाटोळेसह जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपला ‘बायोडाटा’ यावेळी नेत्यांकडे दिला. सर्वच बाबींचा उहापोह सदर आढावा बैठकीत झाल्याचे दिसून आल्याने याला कार्यकर्त्यानीही चांगलाच प्रतिसाद दिल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. राष्टगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी सतिश मेहेंद्रे, श्लोकानंद डांगेसह काँग्रेस पदाधिकार्यांनी प्रयत्न केले.