लव्हाळा बसथांब्यावर बस थांबविण्यास मस्तवाल चालक-वाहकांचा नकार; प्रवाशांना वेठीस धरले!
– प्रवाशांना उतरविले जाते नायगाव थांब्यावर; शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांगांना त्रास
मेहकर (विशेष प्रतिनिधी) – प्रवाशांच्या सोईसाठी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. बस थांब्याच्या ठिकाणी बस थांबविणे हे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र मेहकर-चिखली रोडवरील काही बस या लव्हाळा थांब्यावर न थांबता प्रवाशांना नायगाव थांब्यावर किंवा पुलाजवळ सोडून बस पुलावरून जात असल्याचे दिसून येत आहे. लव्हाळा थांब्यावर बस थांबत नसल्यामुळे जेष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, स्त्री, पुरूष व दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा बस पुलाच्या खालून न जाता लव्हाळा पुलावरून जावून प्रवाशांना लव्हाळा पुलाच्या समोर उतरून देत असल्याचेसुध्दा दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना पायी चालत लव्हाळा येथे यावे लागते.
प्रवासांचे हेलपाटे होत असल्यामुळे शारीरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. प्रवाशांच्या सेवेसाठी व गाव तिथे एसटी अशी संकल्पना राबवून महामंडळ प्रवाशांच्या सेवा व सुविधेला प्राधान्य देत आहे. मात्र कर्मचार्याकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून येत आहे. यामुळे जेष्ठासह, शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी व दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कधी कधी भर पावसात प्रवाशांना उतरल्यामुळे निवारा नसल्यामुळे पावसाने भिजत लव्हाळा फाट्यापर्यंत पायी चालत जावे लागते. तरी मेहकर आगार प्रमुख यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, अनेक बसेस या खिळखिळ झाल्या असून यामधून प्रवास करतांना हाडे खिळखिळ होतात. पाठदुःखीचा त्रास असणार्यासाठी या बसमधून प्रवास करणे डोकेदुःखी ठरत आहे. तर काही बसेस या धुर सोडत असल्यामुळे मोठया प्रमाणात वायू प्रदूषण होते.
मेहकर चिखली मार्गाने येणार्या व जाणार्या बसेस च्या चालकांना लव्हाळा फाट्यावर थांब्यावर थांबण्याबाबत सूचना देण्यात येईल. लव्हाळा थांब्यावर न थांबणार्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
– हर्षल साबळे, आगार प्रमुख मेहकर
—
जेष्ठ नागरिक, दिव्यांगाचा वाली कोण?
जेष्ठ नागरिकांना दिवसाच्या वेळेस किंवा रात्री नायगाव फाटयावर उतरून दिल्या नंतर त्यांना पायी लव्हाळा फाटयावर चालत यावे लागते. पावसात व रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे व सोबत कोणी आधार नसल्यामुळे जेष्ठ नागरीक व दिव्यांगांना तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.