तातडीने मागण्या मान्य करा; अन्यथा आंदोलनाचा आगडोंब उसळेल!
– अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, सरकारच्या नाकर्तेधोरणांवर तुपकर यांची सडकून टीका
चिखली (महेंद्र हिवाळे) – गेल्या खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा व रखडलेली नुकसान भरपाई तातडीने मिळावी, भक्तीमार्ग रद्द करावा, विहिरी व घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे, यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे संयोजक तथा शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांचे चिखली तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज, दि. ०७ ऑगस्टरोजी शेतकरी नेते तथा महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे नेते रविकांत तुपकर यांनी भेट देवून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असून, तातडीने सरकार व प्रशासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढावा, अन्यथा जिल्ह्यात आंदोलन आगडोंब उसळेल, असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्या आज मान्य होण्याची शक्यता असून, मुंबई येथे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी याप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीत या मागण्या विस्ताराने मांडल्या आहेत.
दरम्यान, चिखली येथे रविकांत तुपकर म्हणाले, की वर्ष उलटून गेले आहे, नवीन खरीप हंगाम मध्यावर आला आहे, तरी मागील खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा अद्याप शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाला नाही, फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे, त्यामुळे तातडीने पीकविमा व रखडलेले नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विनायक सरनाईक व नितीन राजपूत हे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करीत आहे. त्याचबरोबर भक्तीमार्ग रद्द करावा, हीदेखील त्यांची मागणी आहे. परंतु त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे. यावेळी त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जर प्रशासन व सरकार फक्त बघ्याची भूमिका घेणार असेल तर या आंदोलनात आम्हाला ही सहभागी व्हावे लागेल, व उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, त्यामुळे प्रशासनाने तातडीने त्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढावा, अन्यथा जिल्ह्यात आंदोलनाचा आगडोंब उसळेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिला आहे.——-
‘महावितरण’कडून उपोषणकर्त्यांची मागणी मान्य!
चिखली शहरालगतची १६ ते २२ गावे उदयनगर उपविभागात समाविष्ट करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला होता. महावितरण हा निर्णय गावकर्यांसाठी त्रासदायक असल्याने ही गावे चिखली विभागातच ठेवण्याची मागणी सरनाईक, राजपूत यांनी लावून धरली आहे. अखेर महावितरणने ही मागणी मान्य करत ही गावे चिखली विभागातच ठेण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले आहे.
पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार!