SINDKHEDRAJAVidharbha

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदारयादीत नावनोंदणी करा!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दुसर्‍या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाची सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात १ जुलै २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांची नोंदणी करणे गरजेचे आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी नव मतदारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार २४ – सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये १ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून, सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसुत्रिकरण अंतर्गत मतदार संघातर्गत ४ मतदान केंद्राची वाढ झालेली आहे. त्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील अंभोरा व जांभोरा गाव हे एका मतदान केंद्रास जोडलेले होते व जांभोरा येथील मतदारांना मतदान करण्यासाठी ८ ते १० किलोमीटर अंतर जाऊन मतदान करावे लागत होते. त्यामुळे जांभोरा येथे मतदान केंद्र करण्यात आले व सिंदखेड राजा तालुक्यात सिंदखेड राजा शहरात २ मतदान केंद्र व ग्रामीणमध्ये पांग्री उगले मध्ये १ मतदान केंद्र असे एकूण ४ मतदान केंद्राची वाढ करण्यात आलेली आहे. देऊळगाव राजा येथील १५ मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला असून, एकूण मतदार संघात एकुण ३४० मतदान केंद्र तयार झालेली प्रारूप मतदार यादी दिनांक ०६ ऑगस्ट, २०२४ रोजी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, चिखली तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर यादया संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधित तहसील कार्यालयामध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
विधानसभा मतदार संघांतील मतदारांनी आपल्या नावाची तपासणी करुन प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावी. सदर कार्यक्रमांतर्गत दिनांक ६ ऑगस्ट, २०२४ ते २० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीदरम्यान दिनांक १० ऑगस्ट, २०२४ (शनिवार) व दिनांक ११ ऑगस्ट, २०२४ (रविवार) तसेच दिनांक १७ ऑगस्ट, २०२४ (शनिवार) व १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) या दिनांकास २४ सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिनांकास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) हे मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणीचे अर्ज स्विकारणार आहेत. मतदार नोंदणीसाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र, आधारकार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा व आपल्या जवळच्या नातेवाईकाचे मतदार ओळखपत्राची छायांकित प्रत आवश्यक आहे. तरी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, चिखली तालुक्यातील दिनांक ०१/०७/२०२४ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले आहे. अशा सर्व पात्र नागरिकांनी लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्या नावाची मतदार यादीत नोंदणी करावी. असे आवाहन प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा तथा मतदार नोंदणी अधिकारी, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ तसेच प्रविण धानोरकर तहसीलदार सिंदखेड राजा व श्रीमती वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देऊळगाव राजा यांनी केले आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!