– ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, नंतर ट्रॅक्टर व हळदीयंत्राला धडकले!
बिबी (ऋषी दंदाले) – बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरपांग्रा गावाजवळ चार ते पाच वाहनांचा विचित्र अपघात होऊन सर्व वाहने चांगलीच क्षतीग्रस्त झाली आहे. या अपघातात प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. काल, दि. १६ जुलैरोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रारंभी ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक झाली. नंतर ट्रॅव्हल्स बस एका घरासमोर उभे असलेल्या ट्रॅक्टर व हळदीच्या वाहनावर जाऊन धडकली. तर ट्रेलर हा कारला धडकला होता.
सविस्तर असे, की बिबीपासून जवळच असलेल्या चोरपांग्रा गावात काल, १६ जुलैरोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास जालनाकडून येणारी ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी १३ झेडएफ ६६ ५१ व मेहकरकडून जालनाकडे जाणारा ट्रेलर क्रमांक एमएच ३४ बीजी ११३३ हे दोन्ही चालक चोरपांग्रा गावाजवळ भरधाव व निष्काळजीपणाने वाहने चालवून चोरपांग्रा गावात एकमेकांना धडक दिली. ही वाहने एकमेकांना घासून यातील ट्रॅव्हल्स ही पुढे जाऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मंदिराच्या ओट्याला धडक देऊन समोर उभे असलेल्या हळदीच्या यंत्राला व ट्रॅक्टरला धडकले. त्यात हळदीचे यंत्र आणि ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून, ट्रॅव्हलचा समोरील ड्रायव्हर बाजूकडील भाग दबून समोरील काच फुटून ट्रॅव्हलचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच, चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच यातील ट्रेलरनेदेखील रस्त्याच्या कडेला घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी ट्रिबल कारला धडक दिली, त्यात कारच्या पाठीमागील भाग दबून व काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील ट्रेलर व प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स यावरील चालकाने भरधाव वेगाने आपापल्या ताब्यातील वाहने चालवल्याने सदरचा अपघात घडला आहे. त्यात सुदैवाने प्रवासी बचावले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सदर अपघाताबाबत पोलीस स्टेशन बिबी येथे चौकशी सुरू असून, अपघातास कारणीभूत असलेल्या दोन्ही वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात एएसआय परमेश्वर शिंदे हे करीत आहेत. मात्र वृत्तलिहीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.