BULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

प्रस्तावित अन्यायकारक बदल्या; इतर मागण्यांसाठी पटवारी आक्रमक!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – पटवार्‍यांच्या प्रस्तावित, अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या संदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला असून, आपल्या प्रलंबित विविध मागण्या तातडीने मंजूर करण्याबाबत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तसेच, या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दि. १६ जुलैरोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे. त्यानुसार, दि. १८ जुलैपासून काळ्याफिती लावून कामकाज करण्यात येणार असून, दि. २३ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दि. २६ जुलै रोजी डी.एस.सी तहसील कार्यालयात जमा करणे व दि. २९ जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे, असा इशारा पटवारी संघाने दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेतीसाठा प्रकरणी महसूल, पोलिस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असतांनादेखील केवळ तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्या गैरसोयीचे ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात महसूल विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाच्याविरोधात एल्गार पुकारला आहे. बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित मागण्यांविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात प्रस्तावित व अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर, शाखा बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली ता.१६ जुलैरोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे.
प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंतीवरून व आपसी बदल्या करणे, जिल्हास्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावेत, कार्यालयाचे प्रलंबित भाडे देण्यात यावे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना खातेअंतर्गत विभागीय परीक्षा लागू करण्यात यावी, याशिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्यास १८ जुलैपासून काळ्याफिती लावून कामकाज करण्यात येईल. तसेच २३ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. २६ जुलै रोजी डी.एस.सी तहसील कार्यालयात जमा करणे व २९ जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे, असा इशारा पटवारी संघाने दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय धोंडगे, सूर्यकांत सातपुते, जिल्हा सचिव अशोक शेळके, जिल्हा उपाध्यक्ष विनोद भिसे, जिल्हा सचिव शिवानंद वाकणकर, जिल्हा सहसचिव संजय डुकरे, कोषाध्यक्ष संतोष राठोड यासह जिल्ह्यातील सर्व पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!