प्रशासकीय अनुभवाची ‘शिदोरी’ घेऊन माजी अधिकारी उतरणार ‘राजकीय आखाड्यात’?
– मेहकर व सिंदखेडराजा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन उभी असून, त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. प्रशासकीय सेवेत काम केलेले काही अधिकारी आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन राजकीय आखाड्यात उतरताना दिसत आहेत. जिल्ह्यातील रहिवासी तथा मंत्रालयीन सहसचिव राहिलेले सिद्धार्थ खरात व उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनीदेखील नोकरीचा राजीनामा दिला आहे. यामध्ये सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा या राखीव मतदारसंघातून तर दिनेश गीते हे सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातून नशीब अजमाविणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. खरात हे मेहकरमधून लढले तर विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्या समोरील राजकीय आव्हान वाढणार आहे.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यावर आहेत. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय नेत्यांबरोबरच आता प्रशासकीय अधिकार्यांनीदेखील राजकारणाची वाट चोखळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेही प्रशासनातील मोठ्या पदावर काम करणारे प्रशासकीय अधिकारी आपण आमदार, खासदार, मंत्री होताना पाहत आहोतच. जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी येथील रहिवासी तथा मंत्रालयातील कक्ष अधिकारी ते सहसचिव पदापर्यंत मजल मारलेले व अनेक मंत्र्यांकडे स्वीय सहाय्यक राहिलेले सिद्धार्थ खरात यांनी अलीकडेच प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सिद्धार्थ खरात हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मेहकर विधानसभेतून नशीब अजमावणार असल्याची चर्चा राजकीय गोटात आहे. मेहकर मतदारसंघ तसा शिवसेनेचा अभेद्यगड समजला जातो, विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेसुद्धा येथून तीनवेळा आमदार राहिले आहेत. विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची येथून हॅट्रिक झाली असून, विदर्भातून सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सर्व पक्षात मधूर संबंध, विकासकामे ही त्यांच्या जमेची बाजू असल्याचे नाकारून चालणार नाही. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सोबत चालत्या गाडीत बसल्याने कट्टर शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणूनच की काय, त्याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला असून, प्रतापगड समजल्या जाणार्या मेहकर विधानसभेत ना. जाधव यांना अवघ्या २७३ मतांचा जेमतेम लीड मिळालेला आहे. कुणीही चालेल परंतु रायमुलकर नको, अशी कट्टर शिवसैनिकांची भावना असून, ठाकरेगट त्यांना पाडण्यासाठी कंबर कसून तयार आहे. परंतु लोकसभेचे गणित विधानसभेत लागू होतेच असे नाही, हेही तेवढेच खरे. मेहकर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी येथून अनेक नावे चर्चेत असली तरी सध्यातरी कोणीही सक्षम उमेदवार पुढे आल्याचे दिसत नाही.
सिद्धार्थ खरात यांनी मंत्रालयात मोठमोठ्या प्रशासकीय पदावर काम केल्याने त्याचा फायदा निश्चितच मतदारसंघासाठी होऊ शकतो. शिवाय, नोकरीत असतानाही विविध सामाजिक उपक्रमांशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही, हे विशेष. विशेष म्हणजे, अकोला येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या १५ जुलैरोजी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या विभागीय बैठकीत मेहकर विधानसभेसाठी सिध्दार्थ खरात यांच्या नावावर चर्चादेखील झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पण ते बाहेरील उमेदवार असल्याने स्थानिकांची नाराजी ओढवली जाऊ शकते, असाही सूर आहे. मात्र असे असले तरी पक्षाने कोणीही उमेदवार दिला तरी एकदिलाने काम करू, असा सूरदेखील नेते व कार्यकर्त्यांचा सध्यातरी ऐकावयास मिळते आहे. याबाबत सिद्धार्थ खरात यांना ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने बोलते केले असता, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसून, परिस्थिती पाहून पाऊल टाकू, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत अधिक खोलात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, छत्रपती संभाजीनगर पश्चिम तसेच सोलापूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातूनही त्यांची चाचपणी सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून माजी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. तहसीलदार पदापासून त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. येळगाव धरणातील गाळ काढण्याची मोहीम त्यांची वाखाणण्याजोगी राहिली होती. समृध्दी महामार्गाची मॉनिटरींग काही काळ केली असल्याने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील बरेच शेतकर्यांशी त्यांचा जवळून संबंध आला आहे. मेहकर येथे काही काळ उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दिनेश गीते देऊळगावराजा तालुक्यातील सुरा येथील रहिवासी आहेत. त्यांचे मतदारसंघात सलोख्याचे संबंध आहेत. तेसुद्धा सिंदखेडराजा विधानसभेतून नशीब अजमावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा एकप्रकारे गड समजला जातो. परंतु, आ. डॉ. शिंगणे हे अजित पवारांच्या खेम्यात गेल्याने त्यांच्याबाबत नाराजीचा सूर ऐकायला मिळत असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. विशेष म्हणजे, नेहमी सत्तेसोबत राहिल्याचा त्यांचा मोह लपून राहिला नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ना. प्रतापराव जाधव येथून ३० हजाराचे जवळपास मतांनी ‘मायनस’ राहिले आहेत, हीसुद्धा आ.शिंगणे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पण, प्रत्येक ठिकाणी लोकसभेची बेरीज-वजाबाकी विधानसभेत लागू होईलच असेही नाही.
हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता असून, येथून दिनेश गीते हे तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दाट आहे. दिनेश गीते हे वंजारी समाजाचे असून, या मतदारसंघात या समाजाची संख्या मोठी आहे. वंजारी समाजाचा एकच उमेदवार असल्यास त्याचाही फायदा त्यांना निश्चितच होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. गीते यांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुरू असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या केंद्रीय कार्यकारिणीने त्यांचा ‘बायोडाटा’देखील मागितल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. याबाबत त्यांच्याशी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने संपर्क केला असता, मतदारसंघातील जनतेनेच आपल्या नावाची चर्चा सुरू केली आहे. पक्षाने आपल्या नावाचा विचार केल्यास यावर नक्की विचार करू, अशी मोजकी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एकंदरीत प्रशासकीय अनुभव घेऊन राजकीय आखाड्यात उतरणार्या व चाकोरीबद्ध काम केलेल्या अधिकार्यांना पक्षाने उमेदवारी दिली तरी जिल्ह्यातील जनता किती पसंती देते, हे येणारा काळच ठरवेल. एवढे मात्र निश्चित.