– शेतकर्यांना साडेपाच कोटींच्या नुकसान भरपाईचे धनादेश वाटप
हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – गेल्या तीस वर्षात प्रचंड विकासकामे आम्ही केली, तरीही लोक सगळे विसरून ऐन निवडणुकीत विपरीत निर्णय घेतात हे दुर्देवी आहे. झालेली विकासकामे आणि या भागात शिवसेनेने केलेला संघर्ष याबद्दल जुन्या जाणत्यांनी नव्यापिढीला सांगणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
दुधा ब्रह्मपुरी येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या दुधा, ब्रह्मपुरी, पाचला, रायपूर येथील शेतकर्यांना नुकसानभरपाईचे ५ कोटी ४० लाख रुपये वितरण करण्याचा समारंभ काल आयोजित करण्यात आला होता. आपल्या अध्यक्षीय भाषणात ना. जाधव यांनी वरील विचार व्यक्त केले. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकारी अभियंता अ. भा. चोपडे, खडकपूर्णा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बा. ज. गाडे, संस्थानचे अध्यक्ष मंचकराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, बबनराव भोसले, दिलीपराव देशमुख, नंदू पागोरे आदींची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत एकनाथ सास्ते, बाळूभाऊ देशमुख, गजानन पाटील म्हस्के, अमोल म्हस्के, विलासराव मोहरुत, अनंतराव जवंजाळ, नंदू पागोरे, शामराव सास्ते, विलास रहाटे यांनी केले होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ शेतकर्यांना भरपाई रकमेच्या धनादेशांचे वितरण नामदार जाधव, आमदार संजय रायमूलकर यांच्याहस्ते करण्यात आले. रस्ते बांधकाम, पूल, सामाजिक सभागृह, तीर्थक्षेत्र विकास कामे आदींसह प्रचंड विकासकामे मेहकर मतदारसंघात आम्ही तीस वर्षात केली. भेटलेल्या प्रत्येकाचे काम आम्ही केले, असे सांगून प्रतापराव जाधव आपल्या घणाघाती भाषणात म्हणाले की, शेकडो कोटींची कामे केली. तरीही काही गावांमध्ये मला दोन आकड्यात मते मिळाली आणि ज्यांनी या भागासाठी काहीच केले नाही, त्यांना तीन आकड्यात लोकांनी दिली! हे चुकीचे आहे. मी आणि आमदार रायमूलकर लोकांसाठी अहोरात्र सहज उपलब्ध असतो, सतत विकासाचा ध्यास आम्हाला असतो. मतदान हे पवित्र काम आहे, ते करतांना दान सत्पात्री असेल, याचा विचार करण्याचे आवाहन नामदार जाधव यांनी केले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व निर्णय लोकोपयोगी आणि क्रांतिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना, शेतीची वीजबिल माफी, एक रुपयात पीकविमा, मुलींसाठी उच्चशिक्षण मोफत, तीन गॅस सिलेंडर मोफत आणि आणखी खूप मोठे धाडसी निर्णय घेतले, असेही ते म्हणाले. पेनटाकळी प्रकल्पाच्या कालवा पाझरामुळे अतोनात नुकसान झाले. भरपाई मंजूर करून घ्यायला दीर्घकाळ मोठा संघर्ष करावा लागला, असेही याप्रसंगी ना. जाधव म्हणाले.
याप्रसंगी आ. रायमुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विवेकानंद आश्रमासही सदिच्छ भेट देऊन कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते यांनी त्यांचे स्वागत करून, आश्रमाच्या विस्तारीत कार्याची माहिती दिली. आश्रमाच्या सेवाकार्यासाठी सदैव मदतीस तयार असल्याची ग्वाही ना. जाधव यांनी याप्रसंगी दिली.
——