– सरनाईक यांना लागले आमदारकीचे वेध; शेतकरी चळवळीतील कामाची पावती मिळण्याची आशा!
चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही जागा लढण्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेली अडिच लाख मते विधानसभेलाही मिळतील, अशी आशा तुपकर यांना आहे. ते स्वतः कुठल्या मतदारसंघातून लढतील, याबाबत सस्पेन्स असला तरी, चिखली मतदारसंघातून लढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तुपकर यांचे कट्टर समर्थक विनायक सरनाईक हे इच्छूक आहेत. तथापि, चिखली मतदारसंघातून स्वतः तुपकर लढतील की सरनाईक यांना उभे केले जाईल, याबाबत अद्याप निश्चितता नाही. सरनाईक हे गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत असून, शेतकरीहितासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना या निवडणुकीत निश्चित मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांना अपेक्षा आहे. दरम्यान, सरनाईक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मुंबईत भेट घेतली असून, या भेटीचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. दमानिया यांनी यापूर्वी एकनाथ खडसे, छगन भुजबळ यासारख्या मोठ्या नेत्यांना अडचणीत आणले होते. त्यामुळे सरनाईक यांच्या भेटीचे गौडबंगाल काय? बुलढाण्यातून कुणाचा नंबर लागणार का? याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत.
तिसरी आघाडी स्थापन करून राज्यभरात विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्याची रणनीती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आखलेली आहे. तर बुलढाण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा तुपकर यांनी यापूर्वीच केलेली आहे. तसेच, तुपकरांनी असे उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा महायुतीला होणार असल्याने महायुतीचे स्थानिक नेतेही तुपकरांना उचकावत असून, उमेदवार उभे करा, निवडणुकीत दाखवून देऊ, अशी भाषा करून तुपकरांना आव्हान देत आहेत. तथापि, कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे तुपकरांनी जाहीर केलेले नाही. स्वतः तुपकर हे कोठून उभे राहणार, हेही त्यांनी सांगितले नाही. चिखली या मतदारसंघातून विधानसभेसाठी शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक हे इच्छूक असून, त्यांनी शेतकरीहितासाठी केलेल्या कामाची पावती या निवडणुकीतून मिळेल, असा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. तसेच, तुपकरांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर तालुक्यातील अनेक प्रमुख नेते हे सरनाईक यांना शुभेच्छा देत आहेत. अलीकडेच सरनाईक यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचीही मुंबईत भेट घेतली होती. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी, राजकीय चर्चा होऊन दमानियांकडून सरनाईक यांना महत्वपूर्ण पाठबळ मिळू शकते, अशी चर्चा आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात प्रबळ लढत होण्याची शक्यता असताना, त्यात सरनाईक यांच्यासारखा तिसरा उमेदवार उभा राहिला तर या दोघांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण पाहाता, शेतकरी मते सरनाईक यांना मिळाली तर काँग्रेसच्या हक्काची असलेली ही मते विभाजीत होतील, व त्याचा फायदा आ. श्वेताताई महाले पाटील यांनाही होऊ शकतो, असेही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. सरनाईक यांनी विधानसभेची तयारी चालवली असली तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे त्यांना उमेदवारी देतात, की स्वतः चिखलीतून लढतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.
————–