बिबी (ऋषी दंदाले) – येथील वसंतराव नाईक विद्यालयाच्या किचन रूमला काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत किचन रूमचे नुकसान झाले आहे. शाळेचे प्राचार्य, पोलिस अधिकारी, महसूल कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सविस्तर असे, की काल (दि.१६) रात्री ठीक १०.३० वाजता शाळेमध्ये असलेल्या किचन रूम समोरील लाकडाच्या गंजीला अचानक भली मोठी आग लागली. ही आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नवयुवक तरुण, वसंतराव नाईक शाळेचे प्राचार्य आर. बी. राठोड सर, शाळेचे कर्मचारी, बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे कर्मचारी, तसेच महसूलचे तलाठी व कोतवाल हे तातडीने घटनास्थळी धावून आले. बिबी गावाचे सरपंचपुत्र दीपक गुलमोहर, उपसरपंच भास्कर खुळे, बिबी येथील सर्व पत्रकार हेसुद्धा हजर होते. त्यानंतर लगेचच लोणार येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व गावातील तरुणांनी बकेट, हंडा मिळेल त्या वस्तूमध्ये पाणी घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबीच्या साह्याने तिथे पेटलेल्या लाकडाच्या तुकड्यांना बाजूला करून आग आटोक्यात आणण्यात आली. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांची तारांबळ उडाली होती.
———–