– आषाढीसाठी 20 लाख भाविक पंढरीत दाखल
– तिरूपतीच्या धर्तीवर मंडप आणि टोकन दर्शनासाठी १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प
पंढरपूर (वैष्णवी देशपांडे) – आषाढी एकादशीनिमित्त भूवैकुंठ पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमला असून, विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. तर चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा महापूर पहायला मिळत आहे. ६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखीतळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सपत्नीक श्रीहरी विठ्ठल व रूख्मिणीमातेची शासकीय महापूजा सकाळी ब्रम्हमुहुर्तावर पार पडली. या पूजेनंतर बळीराजाचे दुःख दूर कर, राज्याला सुखी ठेव, असे साकडे विठ्ठलाला घातले. यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्यांसोबत नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मिळाला. ते गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत.
शासकीय महापूजेप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडिल संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गिरीश महाजन, तानाजीराव सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे कुटुंबासोबत रुक्मिणी मातेच्या पूजेला गेले. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यदेखील होते. यावेळी प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशी हार आणि विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देण्यात आली. महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यातील बळीराजाचे दुःख, कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनमंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. या माध्यमातून भाविकांना विठूरायाचे सहज सुलभ दर्शन घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दर्शन रांग ७ किलोमीटरपर्यंत पोहोचली; मिनिटाला ३५ भाविकांना पदस्पर्श दर्शन!
पावसाने सुरुवातीलाच चांगली सलामी दिल्याने यंदा भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शनरांग सात किलोमीटर अंतरावर पोहोचली आहे. दर्शनरांग मंदिरापासून पत्राशेडच्या पुढे गोपाळपूर येथून पुढे रांझणी रस्त्यावर गेली आहे. दर्शनरांगेतील भाविकांना श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान सुमारे १२ तासाचा कालावधी लागत आहे. एका मिनिटाला साधारणपणे ३५ भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. दर तासाला ४५ हजार भाविकांना दर्शन मिळत आहे. आणखी दर्शन रांग पुढे पुढे सरकत चालली आहे.