ChikhaliCrimeVidharbha

आरटीओने पकडलेले अवैध वाळूवाहतुकीचे ट्रक गर्दीचा गैरफायदा घेत चालकांनी पळवून नेले!

– महसूल पथकाने पाठलाग केला असता, ट्रकमधील वाळू रस्त्यावर फेकली!

चिखली (महेंद्र हिवाळे) – आरटीओ पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रक जालना-चिखली रोडवरील मेहकर फाटा परिसरातील भानखेड शिवारात पकडले. त्यांच्यावर कारवाईसाठी चिखली तहसील कार्यालयाचे महसूल पथक गेले असता, वाळूतस्करांनी तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी करून त्या गर्दीचा गैरफायदा घेत चारही ट्रकमध्ये चालकांना बसवून हे ट्रक पळवून नेले. महसूलच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला असता, त्यांनी ट्रकमधील रेती रस्त्यावर टाकून दिली. त्यामुळे या पथकाला पाठलाग करता आला नाही. दरम्यान, आरटीओच्या पथकाने या ट्रकचे नंबर घेतल्याने त्यांच्या मालकांची ओळख पटली असून, संबंधितांविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच, या ट्रकचा कसून शोध घेतला जात आहे.

सविस्तर असे, की दिनांक १३ जुलैरोजी रात्रीच्या सुमारास आरटीओच्या पथकाला अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रक मिळून आले. त्यांनी या ट्रकला अडवून चिखली तहसीलदारांना माहिती दिली. या माहितीवरून तहसीलदारांनी नायब तहसीलदारांसह मंडल अधिकारी व तलाठी यांचे पथक मेहकर फाट्यानजीकच्या भालगाव शिवारात पाठवले. हे पथक येईपर्यंत वाळूतस्करांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या गर्दीचा गैरफायदा घेत संबंधित ट्रकमध्ये चालकांना बसवून हे ट्रक पळवून नेण्यात आले. या ट्रकचा महसूल पथकाने पाठलाग केला असता, तीन ट्रक मेहकरच्या दिशेने तर एक ट्रक चिखलीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाला. या ट्रकमधील वाळू रस्त्यावर टाकण्यात आल्याने महसूल पथकाला त्यांचा पाठलाग करता आला नाही. हे पथक मेहकर फाट्यावर परत आले असता, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) विवेक भंडारी यांनी पकडलेल्या ट्रकचे क्रमांक व चेसीस क्रमांक घेतले गेल्याचे माहिती दिली. काल, दि.१५ जुलैरोजी आरटीओ कार्यालयाने या ट्रकच्या मालकांची माहिती चिखली तहसीलदार यांना दिली आहे. त्यानुसार, ट्रक क्रमांक एमएच २८ बीबी ८७०७ हा पंढरी मधुकर पवार, रा. हरणी, पो. उदयनगर, ता.चिखली, एमएच २८ बीबी ७२०२ हा संदीप हनुमान गव्हाड, रा. घोटी हिवरा, ता. मेहकर, एमएच २८ बीबी ७२४२ हा कार्तिक संतोष फलटणकर रा. वार्ड नंबर ४, शिक्षक कॉलेनी, मेहकर, एमएच २८ बीबी ६०४० हा ज्ञानेश्वर रामेश्वर नवले रा. सुकळी, ता. मेहकर यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चारही ट्रकमध्ये अंदाजे तीन ब्रास याप्रमाणे १२ ब्रास रेती एकूण किंमत ४८ हजार रूपये होती. हे ट्रक पळवून घेऊ जात रेती रस्त्यावर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या चिखली तहसील कार्यालयातील मंडलअधिकारी भगवान पवार (वय ४९) रा. राऊतवाडी, चिखली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३, २३८, २२१ ३ (५) कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ४८ (७) व ४८ (८) अनुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास चिखली पोलिस करत आहेत.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!