वरिष्ठांच्या आदेशावरून टाकलेला छापा फेल गेला; नायब तहसीलदार अस्मा मुजावर पुन्हा टीकेच्या धनी!
– साखरखेर्डा येथील रमेश तुपकर यांच्यावर छापा टाकण्यासाठी सिंदखेडराजा तहसीलदारांचे होते आदेश!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथील रमेश तुपकर यांच्या घरात रेशनचा अवैध साठा असल्याबाबतची गोपनीय टीप जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाली होती. त्यावरून त्यांनी सिंदखेडराजा तहसीलदारांना छापा टाकून कारवाईचे आदेश दिले. तर तहसीलदारांनी ही जबाबदारी नायब तहसीलदार अस्मा मुजावर व त्यांच्या पथकावर सोपवून मोहिमेवर पाठवले. परंतु, तुपकर यांच्या कुटुंबीयांनी बराच काळ या पथकाला घरात येऊ दिले नाही. त्यानंतर स्वतः तुपकर हे आले असता, वरिष्ठांचे आदेश पाहिल्यानंतर त्यांनी या पथकाला घरात प्रवेश दिला. त्यावेळी घराची झडती घेतली असता, रेशनचा माल मिळाला नाही. केवळ सोयाबीनचे कट्टे मिळून आले. त्यामुळे थेट जिल्हाधिकारी यांना मिळालेली टीप चुकीची निघाल्याने ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार अस्मा मुजावर या पुन्हा एकदा नाहक टिकेच्या धनी ठरल्या. तर मुजावर यांनी प्रकरण मिटविण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप तुपकर कुटुंबीयांनी केला आहे. इतक्या मोठ्या फौजफाट्यात असे पैसे मागितले जाणे शक्य नसले तरी, तुपकर कुटुंबीयांनी याबाबत साखरखेर्डा पोलिसांत तसा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे.
सविस्तर असे, की साखरखेर्डा येथील अमोल निवास असलेल्या रमेश तुपकर यांच्या घरावर महसूल विभागाच्या पथकाने तहसीलदारांच्या आदेशावरून काल दुपारी पाच वाजता छापा टाकला. नेमका छापा टाकण्याचा उद्देश काय होता? याबाबत प्रारंभी गोपनीयता बाळगली गेली. नायब तहसीलदार अस्मा मुजावर या पथकासह धडकल्याने या घरात काय आहे, हे पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. त्यामुळे साखरखेर्डा पोलिसांना पाचारण करावे लागले. महसूल पथकाच्या कारवाईत दोन गोदामपाल, मंडळाधिकारी, तलाठी यांचा समावेश होता. हे पथक तुपकर यांच्या घरी गेले असता, घरातील मधुमती तुपकर आणि त्यांच्या मुलीने त्यांना घरात येण्यास मज्जाव केला. माझे पती घरी नाही ते आल्यावर तुम्हाला काय झडती घ्यायची ती घ्या, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे पथक घराबाहेरच बराचवेळ ताटकळत उभे राहिले. तुपकर कुटुंबीय घराची झडती घेऊ देत नाही, याची माहिती नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिली. तसेच, घराचे फोटोही वरिष्ठांना पाठवले. परंतु, तपासणी करा, असा आदेश वरिष्ठांनी दिलेला असल्याने अस्मा मुजावर व पथक तेथेच थांबले. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश तुपकर, व घरमालक रमेश तुपकर हे घरी आले. त्यांनी छापा टाकण्यासाठी सर्च परवाना मागितला, आणि आपली ओळख काय ते दाखवा, अशी विचारणा केली. मुजावर यांनी आपले ओळखपत्र व वरिष्ठांचे आदेश त्यांना दाखवले. घराबाहेर प्रचंड गर्दी जमा झाल्याने साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली व महसूल पथकाला सहकार्य केले. त्यात स्वतः ठाणेदार स्वप्निल नाईक, पीएसआय रवी सानप, चार जमादार, दोन महिला पोलिस, इतर पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले होते. तहसीलदारांचे लेखी आदेश पाहिल्यानंतर तुपकर कुटुंबीयांनी महसूल पथकाला घराची झडती घेण्याची परवानगी दिली. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तरीदेखील तीन मंडळाधिकारी, २५ तलाठी, प्रभारी नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक यांच्या पथकाने रात्री ९ वाजता घरात प्रवेश करून घराची झडती घेतली. त्या झडतीत २८० सोयाबीन पोते घरात आढळून आले. याबाबतची माहिती नायब तहसीलदार यांनी वरिष्ठांना दिली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हेदेखील रात्री १०:४५ वाजता घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याची एक प्रत तुपकर यांना दिली व नंतर हे पथक परत गेले. दरम्यानच्या काळात नायब तहसीलदार अस्मा मुजावर यांनी दोन तलाठी पाठवून प्रकरण मिटविण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप रमेश तुपकर यांनी केला आहे. तसे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच, आज सकाळी मधुमती रमेश तुपकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, नायब तहसीलदार अस्मा मुजावर, महसूलचे पुरवठा निरीक्षक शेख यांच्यासह चौघांनी घरात घुसून दमदाटी करून, तुमच्या घरात अवैध तांदूळ व गहू, तेल असा रेशनचा साठा आहे. तो आम्हाला दाखवा. प्रकरण निपटावयाचे असेल तर १० लाख रुपये द्या, अशी मागणी केली, अशा आशयाची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार चौकशीसाठी ठेवण्यात आलेली आहे. तथापि, इतक्या फौजफाट्यात अशा प्रकारची डिमांड कोणी अधिकारी करू शकत नसल्याने या आरोपांबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. दरम्यान, महसूलचे कर्मचारी संपावर असताना छापा टाकण्यासाठी किती कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सहभाग कसा काय घेतला, याची दखल उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी घेऊन छापा प्रकरणात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज साखरखेर्डा, गुंज येथील भेटीत केली आणि तसे पत्रकारांना सांगितले.
अतिशय प्रमाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अस्मा मुजावर यांनी तालुक्यातील नदीपात्रांतून रेतीतस्करी करणार्या वाळूतस्करांच्या चांगल्याच मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी वाळूतस्करांच्या टोळीसह काहीजण प्रयत्न करत असल्याने आधीच त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत. त्यातच काल त्यांनी वरिष्ठांच्या लेखी आदेशावरून छापा टाकला. तो फेल गेल्याने त्या पुन्हा एकदा टिकेच्या धनी झालेल्या आहेत. तसेच, त्यांच्यावर थेट पैसे मागितल्याचादेखील आरोप झाला आहे. छापा टाकण्यासाठी आदेश देणारे वरिष्ठ हे नामानिराळे राहात असून, टीप मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी त्याची खातरजमा का केली नाही? तुपकर यांच्या एखाद्या राजकीय विरोधकाने हा खोडसाळपणा केलेला असू शकतो, याची प्राथमिक माहिती तरी संबंधितांनी घेणे गरजेचे होते, असा प्रश्न आता महसूल वर्तुळातून विचारला जात आहे. एखाद्या महिला अधिकार्याला असे तोफेच्या तोंडी देणे वरिष्ठांना शोभते का? असाही सवाल यानिमित्ताने निर्माण झालेला आहे.
—————