चिखली (विनोद खोलगडे) – बांधकामसह विविध क्षेत्रातील कामगारांना कामगार नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. मुख्याधिकारी व ग्रामसेवक हे कामगारांची पिळवणूक करत आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा कामगारांना लाभ मिळत नाही. कामगारहिताच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ जुलैरोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे मोर्चा काढण्यात येऊन, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन कामगार नेते तथा बलुतेदार समाजाचे नेते सतिश शिंदे यांनी केलेले आहे.
याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सतिश शिंदे म्हणाले, की विकासाचा मूळ कणा म्हणजेच कष्टकरी कामगार. कोणत्याही क्षेत्रात कामगारांशिवाय विकास होऊ शकत नाही. बांधकाम क्षेत्रामध्ये लाखो कामगार सहभागी आहेत. निर्मिती क्षेत्रात काम करणारा प्रत्येक कष्टकरी कामगार हा आपला घाम गाळून समाजाची सेवा करत असतो, आणि या सर्वांची दखल घेऊन शासनाने कामगारांसाठी विविध योजना काढलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळत असतो. परंतु या कामगारांची नोंदणी करण्यासाठी शहरी भागातील मुख्य अधिकारी यांचे प्रमाणपत्र व ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. त्याशिवाय त्यांची नोंदणी होऊ शकत नाही. परंतु शासकीय आदेश असूनही ग्रामसेवक तथा मुख्य अधिकारी या कामगारांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. त्यांना प्रमाणपत्र देत नाहीत. मग जर प्रमाणपत्र मिळाले नाही तर नोंदणी कशी होईल, यामुळे नोंदणीअभावी लाखो कामगार या योजनेपासून वंचित आहेत. अशावेळी नोंदणीविनाच कामगार मृत्युमुखी पडला तर याची जबाबदारी कुणाची असावी, कामगार अधिकारी ग्रामसेवक की मुख्याधिकारी या बाबीकडे कुणाचेही लक्ष नाही. हीच बाब कामगारांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या लक्षात आणून दिली व त्यांना विनंती केली की आपणच आमच्या समस्या सोडवा. तेव्हा कामगारहितासाठी राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. खरंतर नोंदणी झालेल्या कामगारांसाठी शासनाने सुरक्षा साहित्य तथा गृहउपयोगी साहित्यसुद्धा वितरित करण्याचे काम सुरू केले आहे. परंतु तेही साहित्य अनेक तालुक्यांमध्ये वितरित होताना दिसत नाही. कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठीसुद्धा मंडळांनी एजन्सी नियुक्ती केली आहे. ती एजन्सीसुद्धा कुठे काय काम करते याची कुणालाही कल्पना नाही. कामगारांसाठी घरकुल योजनासुद्धा आहे, या जिल्ह्यामध्ये हजारो कामगार असे आहेत की ज्यांना घरे बांधण्याची त्यांची क्षमता नाही. अशा किती कामगारांना घरकुल वितरित केले, या व अनेक अशा कामगारांच्या अडचणीसाठी राहुल बोंद्रे यांनी कामगारांच्या समस्येची दखल घेऊन दिनांक १८ जुलैरोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील सर्व बांधकाम क्षेत्रातील निगडित कामगारांनी मोठ्या संख्येने मोर्चासाठी हजर राहून आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडाव्यात. म्हणजेच त्या सर्व समस्यांची दखल अधिकार्यांना घेण्यास भाग पाडू व आपले सर्व कामे मार्गी लावू. तरी सर्व कामगारांनी हजारोंच्या संख्येने बुलढाणा येथे मोर्चासाठी हजर राहावे, असे आवाहन कामगार नेते सतिश शिंदे यांनी केलेले आहे.