डॉ. राजेंद्र शिंगणेंना दिलेला शब्द अजितदादांनी पूर्ण केला; जिल्हा बँकेस ३०० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर!
– ऐन पेरणीहंगामात शेतकर्यांना पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्हा बँकेस ३०० कोटींचे सॉफ्ट लोन देऊन या बँकेला ऊर्जितावस्था मिळेल, या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या शब्दाची अखेर वचनपूर्तता केली आहे. असे लोन मिळून जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा मिळत असेल तरच आपण शरद पवारांची साथ सोडून तुमच्यासोबत येऊ, असे डॉ. शिंगणे यांनी अजितदादांना सांगितले होते. त्यानुसार, आता बँकेला ३०० कोटी रूपये मिळाले आहेत. अलीकडेच, डॉ. शिंगणे हे शरद पवारांकडे परत जाऊन ‘तुतारी’ चिन्हावरच विधानसभा लढवतील, अशी शक्यता बळावली होती. परंतु, अजितदादांनी शब्द पूर्ण केल्याने या शक्यतेला आता पूर्णविराम बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आर्थिक दुर्बल झाली होती. बँकेला सॉफ्ट लोन मिळावे, यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होते. बँकेची स्थिती खालावल्याने याचा परिणाम शेतकर्यांच्या पीककर्ज वितरणावेळी झाला होता. परंतु आता पेरणीच्यावेळी बँकेला घसघशीत तीनशे कोटीचे सॉफ्ट लोन मिळाल्याने बळीराजासाठी ही शुभवार्ता ठरली आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. जिल्हा बँकेने आर्थिक स्थिति सुधारणेसाठी ३०० कोटीचा सॉफ्ट लोन मिळणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविला होता. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये राज्य सहकारी बँकेने बुलढाणा जिल्हा बँकेस सॉफ्ट लोन द्यावे, अशा स्वरूपाचा रूपांतरित झाला होता. मंत्रिमंडळाच्या ११ मार्च रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार, बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिकस्थिती विचारात घेऊन, बँकेच्या प्रगतीचे अवलोकन करता, बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ३०० कोटी सॉफ्ट लोन उपलब्ध होण्यासाठी शासनाने हमी घेतली आहे. या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अथक प्रयत्नाने अशा प्रकारचे शासन हमीवर, राज्य बँकेकडून सॉफ्ट लोन मिळणारी बुलढाणा जिल्हा बँक ही राज्यातील पहिली बँक ठरली आहे. शासनाने हमी घेतल्यानंतर, बुलढाणा जिल्हा बँकेस राज्य सहकारी बँकेच्या दिनांक २६/६/२०२४ रोजीच्या मंजुरी पत्रानुसार ३०० कोटी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे. सदर मंजूर कर्जापैकी बँकेने सुरवातीस राज्य बँकेकडून ५ कोटी उचल केलेला असून, या रक्कमेचे योग्य प्रकारे नियोजन करून बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेने सुरक्षित कर्जवाटपाचे धोरण ठरविले आहे.
—–
असे राहील कर्जवाटप :
पगारदार नोकरांसाठी (ST/MT/OD) इ., सोनेतारण कर्ज, पगारदार नोकरदारांच्या पतसंस्थांना कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ/एम.एस. आर. एल. एम. एन. एल. एम.७) बचत गट/ सूक्ष्म कर्ज पुरवठा / इतर शासकीय कर्ज योजनांतर्गत कर्ज पुरवठा, कॅश क्रेडिट कर्ज, शेती व बिगर मध्यम मुदत कर्ज (गोडावून/वैयक्तिक इ.) वरीलप्रकारच्या योजनेअंतर्गत बँकेने कर्ज वाटप सुरू केले आहे. या विविध प्रकारच्या कर्जवाटपामुळे बँकेस निरनिराळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहेत. व बँकेच्या उत्पन्नात वाढ होऊन बँकेचा संचित तोटा कमी होण्यास मदत होऊन बँक पूर्वपदावर येणार आहे.
—
कर्ज योजनेचा लाभ घ्या – डॉ.खरात
जिल्ह्यातील सर्व कर्जदार तसेच ठेवीदार, संस्थांना आवाहन करण्यात येते की, आपल्या जास्तीत जास्त ठेवी बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेत ठेवाव्यात व बँकेच्या वरील नमूद निरनिराळ्या कर्ज योजनांचा लाभ घेवून बँकेशी व्यवहार वाढवावा. असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी डॉ.अशोकराव खरात यांनी केले आहे.