Breaking newsHead linesMarathwada

वारकरी भाविकांवर काळाचा घाला; काळीपिवळी विहिरीत कोसळून सात ठार; तिघे अत्यवस्थ

– दुचाकी-काळीपिवळीच्या धडकेनंतर घडली दुर्देवी घटना, दुचाकीस्वारही जखमी

जालना (जिल्हा प्रतिनिधी) – पंढरपूर येथून श्रीहरी विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या भविकांना राजूरकडे घेऊन जाणार्‍या भरधाव काळीपिवळी जीप आणि दुचाकीचा अपघात होऊन ही जीप विहिरीत कोसळली. ही घटना गुरूवारी (दि.१८) दुपारी चार वाजेच्या सुमारास राजूररोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ घडली. जीप कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या भीषण अपघातात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना जालन्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, हाती आलेली मयतांची नावे अशी, प्रल्हाद विटले, प्रल्हाद महाजन, नारायण किशन नीहाळ, नंदाबाई बाळू तायडे, चंद्रभागाबाई अंबादास घुगे, रा. चनेगाव तर तपोवन येथील ताराबाई भगवान मालुसरे अशी आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र राजूर परिसरातील चनेगाव येथील काही भाविक पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन हे भाविक गुरूवारी जालन्यात पोहोचले. राजूर येथे जाण्यासाठी हे भाविक काळीपिवळी जीपमध्ये बसले. या जीपमध्ये १५ ते २० प्रवासी होते. दरम्यान, जीप राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळील खडेश्वरबाबा मंदिर ते वसंतनगर येथे आल्यानंतर भरधाव दुचाकीने जीपला धडक दिली. या अपघातात जीप रस्त्याच्या बाजूला एका शेतात असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. काही कळण्यापूर्वीच हा अपघात झाल्याने जीपसह सर्व प्रवासी विहिरीत पडले. चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करत, दहा प्रवाशांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तीनजणांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!