शेतकरी संघटनांच्या नेत्यांची पुण्यात बैठक; रविकांत तुपकरांची गैरहजेरी खटकली!
– तुपकरांचा स्वतंत्र तिसर्या आघाडीचा नारा; पुण्यातच २४ जुलैला बोलावली समर्थक नेते व कार्यकर्त्यांची बैठक!
पुणे (खास प्रतिनिधी) – राज्यातील शेतकरीप्रश्नांसह आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणूक परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार या नेत्यांनी व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सर्वच शेतकरी संघटनांच्या नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. तथापि, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे या बैठकीला हजर नव्हते. त्यांना या बैठकीचे निमंत्रण होते की नाही, किंवा त्यांनी या बैठकीला जाणे टाळले? याबाबत अधिकृत खुलासा होऊ शकला नाही. दुसरीकडे, तुपकर यांनी यापूर्वीच तिसरी आघाडी स्थापन्याचे जाहीर केले असून, आ.बच्चू कडू यांच्यासह ही तिसरी आघाडी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यादृष्टीने तुपकर यांनीदेखील २४ जुलैरोजी पुण्यात आपल्या कार्यकर्त्यांची व राज्यभरातील नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सद्या रविकांत तुपकर हे राज्यव्यापी दौर्यावर असून, त्यांच्या मराठवाडा, विदर्भातील शेतीप्रश्नांवरील आंदोलन, मोर्चे यांना जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे.
राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांसह होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर सर्व शेतकरी संघटना व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनांच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतला आहे. पुणे येथील नवीन शासकीय विश्रामग्रह येथे यासंदर्भात या नेत्यांची विस्तृत बैठक पार पडली. या बैठकीत परिवर्तन आघाडीच्यावतीने बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, सातत्याने पडत चाललेले शेतमालाचे दर, कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी, केंद्र सरकारचे चुकीचे आयात व निर्यात धोरण, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेली राज्याची आर्थिक स्थिती, राज्यातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये काम करणार्या सामाजिक संघटना यांना सोबत घेऊन लढा उभारून परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या आघाडीच्यावतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला. ३० जुलैरोजी छत्रपती संभाजीनगर येथे जागावाटप व पुढील धोरणाबाबत बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले. या बैठकीस माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॉ. महावीर अक्कोळे, योगेश पांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी नेत रविकांत तुपकर या आघाडीत सामील होणार, की आपली वेगळी चूल मांडणार?
दरम्यान, पुण्यात पार पडलेल्या आजच्या बैठकीला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची उपस्थिती नव्हती. त्यांना या बैठकीचे निमंत्रण होते की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी तुपकर व राजू शेट्टी या दोघांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. तथापि, तुपकर यांनी येत्या २४ जुलैरोजी पुण्यातील नवी पेठ येथील एस एम जोशी फाउंडेशन सभागृहात राज्यस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातून त्यांचे समर्थक शेतकरी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे हजर राहणार आहेत. त्यामुळे तुपकर हे राजू शेट्टी यांच्यासोबत जाणार की त्यांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे बच्चू कडू यांच्यासह तिसरी आघाडी स्थापन करून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार? याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. बुलढाणा लोकसभा निवडणुकीत तुपकर यांनी अडिच लाख मते घेतली होती. विधानसभा निवडणुकीत स्वतः तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून किंवा सिंदखेडराजा मतदारसंघातून निवडून येऊ शकतात. तर चिखली मतदारसंघातूनही त्यांचा उमेदवार चांगली मते घेऊ शकतो, असे राजकीय चित्र आहे.
———–