चिखली (महेंद्र हिवाळे) – सैलानी येथे भोंदूबाबाविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल झाला असून, जिंतूर येथून मनोरुग्ण नातवाच्या उपचाराकरिता आलेल्या वृद्ध महिलेच्या नातवावर अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी मंत्र व भीती दाखवून फसवणूक व शारीरिक छळ झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित भोंदूबाबाला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्याच्याकडून जादूटोण्याचे साहित्यदेखील जप्त करण्यात आलेले आहे.
सविस्तर असे, की सैलानी दर्गा परिसरात भोंदू लोकांचा हैदोस वाढत चाललेला आहे. त्याला आळा घालण्यासाठी सैलानी येथे भोंदूबाबाविरुद्ध जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी या कायद्यान्वये अशाप्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेतील आरोपी इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी याने सौ.सुमनबाई विठ्ठल जाधव (वय ७२) रा. येनोली तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी यांचा नातू विकी पुंडलिक जाधव याच्यावर सैलानीबाबा दर्गा येथे जंतरमंतर करून त्याच्या अंगावर लिंबू कापून उतरून घेवून पैशाची मागणी करून भीती दाखवली व त्यांची फसवणूक केली. तसेच, या मुलाचा शारीरिक छळदेखील केला. त्याच्या हात पायाला बेड्या टाकून साखळीने बांधून अघोरी उपचार करून या मनोरूग्ण मुलाचा छळ केला. ही बाब असह्य झाल्याने सौ. सुमनबाई विठ्ठल जाधव यांनी रायपूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून भोंदूबाबा इरफान शहा रमजान शहा सैलानी याच्याविरुद्ध १४८/२४ कलम ३(१).३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस ठाण्याचे राजेश गवई व ओमप्रकाश साळवे यांनी केली. या घटनेचा तपास पोलिस अधीक्षत सुनील कडासणे, अप्पर पोलिस अधीक्षक बी बी महामुनी, डीवायएसपी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दुर्गेश राजपूत हे करत आहेत.
सैलानीमध्ये यापूर्वी कधीच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे सदरची घटना ही पहिलीच असून, यापुढे देखील असे आघोरी प्रकार करणारे भोंदूबाबा आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच जनतेला आवाहन आहे, की अशा भोंदूबाबा यांना कोणताही प्रतिसाद न देता, यांना बळी न पडता रूग्णावर वैद्यकीय उपचारच करावेत. सैलानीबाबा यांचे फक्त दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करावी. तसेच अशा भोंदूबाबाविरुद्ध समोर येऊन पोलिसांना माहिती द्यावी. रायपूर पोलीसदेखील याबाबत कठोर कारवाई करीत आहे, असे आवाहन ठाणेदार राजपूत यांनी जनतेला केलेले आहे.