सिंदखेडराजा निवासी नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर यांनी दोन आठवड्यात दिले तब्बल 2 हजार 400 दाखले!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तहसील कार्यालयात कुणी अधिकारी यायला तयार नाही, अशी परिस्थिती असताना शासनाने डॉ.आस्मा मुजावर यांची देऊळगावराजावरून सिंदखेडराजा येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून बदली केली. त्यामुळे या तहसील कार्यालयाला अनेक दिवसापासून रिक्त असलेले निवासी नायब तहसीलदारपद कायमस्वरूपी मिळाले. या पदावर डॉ.आस्मा मुजावर या रुजू होताच, त्यांनी आपल्या कामकाजाला धडाकेबाज सुरुवात करत दोन आठवड्यात तब्बल 2हजार 400 प्रमाणपत्र निकाली काढले. त्यामुळे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन विद्यार्थ्यांना कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या दाखल्यावर डिजिटल सिग्नेचर करतात, त्यामुळे तात्काळ दाखले मिळत असल्याने विद्यार्थी, पालक आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अव्वल कारकून असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रभार देऊन तहसीलचे काम करून घ्यावे लागत होते. आता या ठिकाणी कायमस्वरूपी निवासी नायब तहसीलदार मिळाल्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये तत्परता आली आहे. नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर या धडाकेबाज महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अवैध रेतीवर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. त्यामुळे रेतीमाफियामध्ये त्यांची एक वेगळी दहशत आहे. त्यांना आता निवासी नायब तहसीलदारपद दिल्यामुळे त्यांनी आपल्या पदाला न्याय देत दोन आठवड्यात तब्बल 2हजार 400 विविध प्रकारचे दाखले प्रमाणपत्र निकाली काढले आहेत. यामध्ये उत्पन्नात दाखले, आदिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आदीसह विविध दाखल्याचा समावेश आहे . आतापर्यंत त्यांच्याकडे एकही पेंडींग दाखले नाहीत. तात्काळ दाखले मिळाल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दलालामार्फत कोणीही येऊ नये; डॉ.आस्मा मुजावर यांचे आवाहन
आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे दाखले ताबडतोब काढून देण्यात येत आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांनी दलालामार्फत येऊ नये. विशेष म्हणजे, दवाखान्याच्या कामासाठी तात्काळ उत्पन्नाचे दाखले काढून देण्यात येतात. काही अडचण असल्यास लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहनदेखील नायब तहसीलदार डॉ.आस्मा मुजावर यांनी केले आहे.
—————