पीकविमाप्रश्नी आ. श्वेताताई महाले आक्रमक; ४९ हजार शेतकर्यांच्या तक्रारी का फेटाळल्या?
चिखली (महेंद्र हिवाळे) – पीकविमा हा शेतकर्यांच्या हक्काचा आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील १ लाख ४४ हजार शेतकर्यांनी पीकविमा भरला होता. त्यापैकी ५२ हजार शेतकर्यांनी तक्रारी केल्या. परंतु प्रत्यक्षात फक्त ३ हजार ८८९ शेतकर्यांच्याच तक्रारी ग्राह्य धरल्या गेल्या आणि सुमारे ४८ हजार ९८९ शेतकर्यांच्या तक्रारी रोगाचे कारण देऊन फेटाळण्यात आल्या. या तक्रारी फेटाळण्यात येऊन शेतकर्यांना वार्यावर सोडण्यात आले, असा संतप्त सवाल चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उपस्थित करत, विधानसभेत पीकविमा कंपनीला धारेवर धरले. उर्वरित शेतकर्यांना तातडीने पीकविमा देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
विधानसभेतील चर्चेत आ. श्वेताताई महाले पाटील यांनी सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, की सरकारने शेतकर्यांना १ रुपयात पीकविमा दिला, आणि शेतकर्यांनी पीकविमा काढला. परंतु पीकविमा कंपनीचे धोरण शेतकर्यांच्या हिताचे नसल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील १ लाख ४४ हजार शेतकर्यांनी पीकविमा भरला होता. त्यापैकी ५२ हजार शेतकर्यांनी तक्रारी केल्या. परंतु प्रत्यक्षात फक्त ३ हजार ८८९ शेतकर्यांच्याच तक्रारी ग्राह्य धरल्या गेल्या आणि सुमारे ४८ हजार ९८९ शेतकर्यांच्या तक्रारी रोगाचे कारण देऊन फेटाळण्यात आल्या. पीकविमा हा शेतकर्यांचा हक्क आहे आणि हा हक्क शासनाने त्यांना मिळवून दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान आ. श्वेताताई महाले यांनी मांडली आहे. याप्रश्नी राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे आता शेतकरीवर्गाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पीकविमा या शेतकरीहिताच्या गंभीरप्रश्नी आ. श्वेताताईंनी विधानसभेत आवाज उठविल्याने शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तसेच, ताईंनी आमचा पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
—-