बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा शहराला लागून असलेल्या मालविहिर ग्रामपंचायतमध्ये पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी थेट ध्वजस्तंभावर चिखल फेकला गेल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला.
सविस्तर असे, की ग्रामपंचायतीच्या विस्तारित भागातील 7 ते 8 महिलांनी रस्ता चिखलमय झाल्यामुळे मालविहिर ग्रामपंचायतीवर चिखलफेक आंदोलन केले. मात्र आंदोलन करत असताना यातील महिला भान विसरल्या आणि आम्ही एखाद्याला मारू अशी धमकी देत आणि त्यांनी थेट ध्वजस्तंभावर चिखल फेकल्याने वातावरण चांगलेच चिघळले. परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील वाद टळला. ग्रामपंचायतीने रस्ते चिखलमय झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर 25 जून रोजीच चिखलमेर रस्त्यांवर मुरूम टाकण्याचा ठराव घेतला होता. मात्र तरीसुध्दा या महिलांनी आंदोलन करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने वाद निर्माण झाला होता. सद्या या परिसरात शांतता आहे.