घाटाखालील तालुक्यांत पावसाने हाहाकार; तातडीने मदत द्या, नुकसानीचे पंचनामे करा!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – रविवारपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुके जलमय झाले आहेत. त्यातच घाटाखालील भागात विशेषतः खामगाव व शेगाव तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात नागरिकांना तातडीने मदत करावी. तसेच घरांचे व शेतीचे आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. घाटाखालील तालुक्यांत पावसाने हाहाकार माजविला असून, मोठ्या प्रमाणात मालमत्तेची व शेतीपिकांची हानी झाली आहे. काल पुरात इनोव्हा गाडी वाहून गेली असली तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पूरपरिस्थितीबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून, या निवेदनात नमूद आहे की, रविवार, दि. ७ जुलैपासून संपूर्ण जिल्हाभरात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात हा पाऊस शेतकर्यांना दिलासा देणारा असला तरी घाटाखाली मात्र पावसाने कहर केला आहे. विशेषतः खामगाव आणि शेगाव तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसून घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे. नागरिकांना आवश्यक ती मदत पोहोचवण्यास त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व कुणाची जीवितहानी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने तातडीने कराव्या. तात्पुरती निवार्याची व्यवस्था करावी, त्यांच्या राहण्याची व जेवणाचीदेखील व्यवस्था करावी. तसेच पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांसह शेतजमिनी खरडून गेले आहेत. शेतकर्यांसमोर हे भले मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान झाले व ज्या ठिकाणी घरांचे नुकसान झाले, अशा ठिकाणी पाणी ओसरताच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
खामगाव, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यांत जोरदार पाऊस!
काल रविवारी रात्री दहा वाजेनंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला. खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्याने या दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. खामगाव तालुक्यात तब्बल ९२.८ तर मोताळा तालुक्यात ९०.४ मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी, पेडका पातोंडा, आवार, नागापूर या गावात कोसळधार पावसाने काल रात्रभर हजेरी लावली. खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक वाहून गेली. सुदैवाने या कारमध्ये कुणीच नसल्याने संभाव्य अनर्थ टळला! ही कार नदीच्या काठावर उभी करण्यात आली होती, असे गावकर्यांनी सांगितले. याचबरोबर काठावर असलेली पान टपरीसुद्धा वाहून गेली.
———