BuldanaBULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढणार!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शनिवारी दि. ६ जुलै रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक झाली. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. भाऊ आता थांबू नका, शेतकरी आपल्या पाठीशी आहेत. आता थांबायचे नाही विधानसभा निवडणूक लढायचीच असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळेस हजर होते. कुणी सिंदखेडराजा विधानसभेतून, काही कार्यकर्त्यांनी चिखली, काहींनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून तुपकर यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. काही कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांनी एखाद्या पक्षात प्रवेश करून निवडणुक लढवावी, असेही मत व्यक्त केले. अखेर बैठकीच्या शेवटी रविकांत तुपकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते विचारात घेत, मोठी राजकीय घोषणा केली. बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली, तर राज्यपातळीवर निर्णय पुण्यात बैठक घेवून जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सुरवातीला बोलतांना राविकांत तुपकर म्हणाले की, आपली लढाई विस्थापितांची लढाई आहे, त्यामुळे सगळ्यांनी मनमोकळे पणाने बोलावं, तुमची मत लक्षात घेता यावी, झालेल्या चुका दुरुस्त करून पुढे जाता यावे, यासाठी बैठकीचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई तुमच्यामुळेच इथपर्यंत आली आहे, असेही तुपकर म्हणाले. तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रात बुलडाणा लोकसभेची निवडणूक गाजवू शकलो. ज्यांनी मतदान केले त्यांचे धन्यवाद ज्यांनी मतदान केले नाही, त्यांच्याबद्दलदेखील माझ्या मनात कोणताही राग नाही. आपण या निवडणुकीत नसतो तर कदाचित मतदानाची टक्केवारी कमी झाली असती, आपल्यामुळे या लढतीत रंगत आली. पक्ष नसतांना, पैसा नसतांना, सगळे पुढारी विरोधात असताना सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली. त्यामुळे सगळ्या पुढार्‍यांनी तोंडात बोट घातली आहेत. सामान्य घरातील पोरगा प्रस्थापितांच्या नाकात दम आणू शकतो हा संदेश बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेला असल्याचे ते म्हणाले. आणखी ६०- ७० हजार मते मिळवता आली असती तर थोड्याफार फरकाने आपण जिंकलोही असतो, अशा भावना तुपकरांनी यावेळी व्यक्त केल्या. काही आमदार आपल्याला २५ – ३० हजाराच्या पुढे धरत नव्हते. मात्र निकाल लागल्यानंतर त्यांच्या नाकात दम आला. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, आपल्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे इकड कमी झालो, तिकड कमी पडलो याने निराश न होता जिथे कमी पडलो तिथे कशी उभारी घेता येईल याचा विचार करून पुढं जायचं आहे. ज्या पुढार्‍यांनी आपल्याला प्रचंड विरोध केला त्यांच्या गावातच आपल्याला लीड आहे. अनेक पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या गावात आपण पुढे आहोत. आपल्यामुळे नेत्यांना शेतकर्‍यांची ताकद कळल्याचेदेखील तुपकरांनी यावेळी बोलून दाखविली. रविकांत तुपकर यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली. यावेळी कोणी पक्षात जाण्याचा तर कोणी स्वतंत्र पक्ष उभा करण्याच्या भावना व्यक्त केल्या. तर कुणी सिंदखेडराजा, तर कुणी चिखली तर कुणी बुलढाण्यातून लढा लढण्याचा तुपकरांना आग्रह केला. यासर्व समर्थकांच्या भावना तुपकरांनी यावेळी शांतपणे ऐकून घेतल्या.
—-

रविकांत तुपकरांचे नेमके काय काय ठरलं?

२२ वर्षाच्या प्रवासात जे निर्णय घेतले ते माझ्यावर प्रेम करणार्‍या लोकांना विचारूनच घेतले. हा पराभव जो आपला झाला, त्याची जबाबदारी माझी आहे. मी या पराभवाला कुणालाही जबाबदार धरणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही साथ द्याल का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमुखाने हुंकार भरला. शेतकर्‍यांची मोठी व्होट बँक उभी करून बुलढाणा जिल्ह्यातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार आहोत, आणि हे सर्व उमेदवार शेतकर्‍यांचे उमेदवार असतील, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. उद्यापासून स्वतंत्रपणे आपण तयारीला लागणार आहोत. ६ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जिंकण्यासाठी उभे करायचे आहेत, अशी घोषणा तुपकर यांनी केली. स्वतः कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार यावर त्यांनी आजच्या कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले नाही. तर राज्यपातळीवर निर्णय पुण्यात पदाधिकार्‍यांची बैठक घेवून जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सोयाबीन-कापूस, पीकविमा, नुकसान भरपाई, वन्य प्राण्यांच्या त्रास यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभारणार
शेतकरी चळवळ हा आपला आत्मा आहे, तो आपण कदापिही सोडणार नाही, गेल्या काही वर्षांपासून आपण सोयाबीन-कापूस, पिकविमा व नुकसान भरपाई साठी लढा उभारत आलो आहोत, या लढाईला काही ना काही प्रमाणात यश मिळाल्याने शेतकर्‍यांना आधार मिळाला, यावर्षीही सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई या सर्व प्रश्नांवर माेठा राज्यव्यापी लढा उभा करण्याची घोषणा रविकांत तुपकरांनी यावेळी केली. तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे वन्य प्राण्यांच्या त्रासपासून शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी सरकारने तातडीने योजना आणावी, यासाठीही मोठा लढा उभा करणार असल्याचीदेखील घोषणा तुपकरांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!