Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले!

– बुलढाणा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीतून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा
– सहाही मतदारसंघात उमेदवार उभे करणार – रविकांत तुपकर
– प्रतापरावांनी नांदी लागू नये, शेतकरी घेऊन दिल्ली गाठेन; तुपकरांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधवांना ठणकावले!

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज (दि.६) बुलढाणा येथील गोलांडे लॉन्स येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीतून कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तुपकरांना गळ घातली. त्यानंतर महत्वपूर्ण राजकीय घोषणा करत, तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवून तब्बल अडिच लाख मते घेतली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा पराभव होऊन महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे फार कमी फरकाने विजयी होऊ शकलेत. आतादेखील तुपकरांनी सहाही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा महायुतीला होणार आहे, अशी राजकीय चर्चा आहे. तुपकरांच्या या निर्णयामागे कुणाचे राजकीय पाठबळ आहे का? अशीही चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.

बुलढाणा येथील बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यासाठी बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा असे पर्याय कार्यकर्त्यांनी सूचविले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची विनंती केली. तर काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाण्याची सूचना केली. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर तुपकर यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करत, जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा करत, स्वतंत्र आघाडी स्थापन करून निवडणूक लढवू, असे जाहीर केले. तथापि, ते स्वतः कोणत्या मतदारसंघातून लढणार हे त्यांनी जाहीर केले नाही.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या या घोषणेनंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुपकरांनी उमेदवार उभे केले तर त्याचा सर्वाधिक फायदा हा महायुतीलाच होणार असल्याचे लोकसभा निवडणुकीचा कौल पाहाता दिसून आले आहे. तर एका वरिष्ठ नेत्याने तुपकरांची ही घोषणा म्हणजे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्याचा कार्यक्रम असून, या दोघांनी तुपकरांना चर्चेला बोलवावे, यासाठी हा सारा खटाटोप आहे, असेही हा नेता खासगीत बोलताना म्हणाला.
——
चिखली येथील नागरी सत्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकर यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत रविकांत तुपकर यांनी सांगितले, की प्रतापराव जाधवांनी माझ्या नादाला लागू नये. मी नंगा फकीर आहे. आतापर्यंत बुलढाणा, मुंबई, नागपुरात आंदोलने केलीत, आता दिल्लीत आंदोलन करेन, असा इशारा त्यांनी मंत्री जाधव यांना दिला. अर्थात, यापुढे माझ्यावर बोलाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर शेतकरी घेऊन आंदोलनाला बसेन, असा अप्रत्यक्ष इशाराच तुपकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना या वक्तव्यातून दिला असल्याचेही राजकीय धुरिणांनी स्पष्ट केले.
———

  • – बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार – रविकांत तुपकर
  • – रविकांत तुपकर यांची विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा
  • – तुपकर यांनी आज बोलावली होती कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांची बैठक
  • – जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, खामगाव, जळगांव जामोद, मेहकरमधून उमेदवार उभे करणार
  • – आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे रविकांत तुपकरांचे आदेश
    ———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!