श्रीगोंदा (अमर छत्तीसे) – नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा नेहमीच सर्वच बाबतीत अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर कार्यकर्त्यांचे लक्ष असतेच. असाच प्रकार श्रीगोंदा शहरात घडला आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी असणार्या ठेकेदाराबरोबर नगरपालिका हद्दीतील कामांबाबत चर्चा करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना मानणार्या गटातून ‘विकी दादा’ ठेकेदार जरा लांब ठेवा, अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिक व पाचपुते यांना मानणार्या कार्यकर्त्यांतून येऊ लागल्या आहेत. २०१४ लाही अशाच ठेकेदार मंडळीमुळे निकाल विरोधात गेला होता, अशी भावनाही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे थंडावत असताना आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दि. ५ जुलैपर्यंत आचारसंहिता असल्याने अजून कामे सुरू होईनात, पण जी प्रलंबित कामे आहेत, याचा आढावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते हे स्वतः घेत आहेत. अशाच प्रकारे श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील विजेच्या प्रशनासंदर्भात विक्रमसिंह पाचपुते यांनी शहरातील वीज प्रश्नाचा आढावा घेतला. यामध्ये ज्या वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारावर वीज कनेक्शनसाठी पैसे घेऊन फसविल्याचा गुन्हा दाखल आहे, तोच ठेकेदार विक्रमसिंह पाचपुते यांना मार्गदर्शन करतानाचा फोटो सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित ठेकेदार यांच्या बाबतीत अनेकदा आमदार बबनराव पाचपुते, तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे तक्रारी झाल्या होत्या, पण तक्रारीची काही दखल घेतली गेली नाही. याच ठेकेदाराला आढळगावमध्येही काम दिले होते, ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. पण अशा तक्रार दाखल असलेल्या ठेकेदाराबरोबर ‘विकी दादा’ दिसणे हे त्यांच्या प्रतिमेला शोभनीय नाही, अशी चर्चा श्रीगोंद्यात रंगली आहे.
विकीदादांनी ठेकेदार पोसण्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यावी – संतोष सोनवणे
विक्रमसिंह पाचपुते यांनी २०१४ला जे ठेकेदार पोसले तेच विरोधात होते. त्यावेळी फक्त बहुजन सर्वसामान्य समाज दादांबरोबर राहिला होता. पण कोणीही ठेकेदार बरोबर नव्हता. त्यामुळे दादा ठेकेदार पोसण्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता जपा ऐवढीच अपेक्षा आहे.– संतोष सोनवणे, आढळगाव येथील पाचपुते समर्थक
————–