महाले दाम्पत्यांनी घेतले संत मुक्ताईंच्या पालखीचे दर्शन; वारकर्यांचे धुतले पाय!
– मुक्ताईंच्या पालखीचेही केले सारथ्य; खणानारळाने भरली ओटी
चिखली (महेंद्र हिवाळे) – आषाढीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला जाणार्या संतश्रेष्ठ मुक्ताईंच्या पालखीचा आज, दि.२३ जूनरोजी चिखली नगरात मुक्काम झाला. चिखलीमध्ये या पालखीचा प्रवेश होताच नागरिकांनी मुक्ताईंचे उत्स्फूर्त असे स्वागत केले. याप्रसंगी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले व त्यांचे पती तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील या दाम्पत्याने संत मुक्ताईंच्या पादुकांचे दर्शन घेतले, व दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकर्यांचे पाय धुवून यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, महाले दाम्पत्याच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर संत मुक्तांचे दर्शन व आशीर्वादाचा अलभ्य लाभ त्यांना झाला.
शेकडो वर्षापासून असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व वारकरी संप्रदायाचे आस्थास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा महामेळा भरत असतो. यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेकडो दिंड्या पायी चालत पंढरपुरात पोहोचतात. विठू नामाचा गजर करत भक्तीरसात अखंड बुडालेल्या या वारकर्यांचे ठीकठिकाणी व उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाते. या दिंड्यांमध्ये मुक्ताईनगर येथून येणार्या संत मुक्ताबाईच्या पालखीचादेखील विशेष मान असतो. दि.१८ जूनरोजी या पालखीने मुक्ताईनगरातून प्रस्थान ठेवले असून, दि. २३ जूनरोजी चिखली नगरात ही पालखी दाखल झाली. या दिंडीचे यंदाचे ३१५ वे वर्ष असून, वारीचे चिखलीकरांनी हर्षोल्हासात स्वागत केले. नगरात प्रवेश करतात आ. श्वेताताई महाले व विद्याधर महाले यांनी सर्वप्रथम संतश्रेष्ठ मुक्ताईंच्या पादुकांचे पूजन करून त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. मुक्ताई माऊलीची खणानारळाने ओटी भरली व त्यानंतर मुक्तांईंच्या पादुका असलेल्या दिंडीमधील रथाचे सारथ्य करत या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या महिला व पुरुष वारकर्यांचे पाय धुवून त्यांचे मनोभावे स्वागत केले. विशेष म्हणजे, आज आ. श्वेताताई महाले व विद्याधर महाले यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या महत्त्वाच्या दिवशी संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पादुकांचे दर्शन व आशीर्वादाचा अलभ्य लाभ या दांपत्याला झाला त्याची चर्चा संपूर्ण शहरात होती.
मतदारसंघाच्या विकासासाठी शक्ती दे! – आ. श्वेताताईंनी केली मुक्ताईस प्रार्थना
मागील साडेचार वर्षांपासून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेताताई महाले विधानसभेत अतिशय प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत आहेत. विशेषतः गेल्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी चिखली मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांची अभूतपूर्व विकासकामे खेचून आणत मतदारसंघाचा कायापालट करण्याचे अभियान हाती घेतले आहे. मतदारसंघातील विकासकार्याला अधिक गतिमान करण्यासाठी व मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मला शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना आ. श्वेताताई महाले यांनी याप्रसंगी संतश्रेष्ठ मुक्ताईच्या चरणी केली.