Head linesSINDKHEDRAJAVidharbha

‘केवायसी’करून महिना झाला तरी शेतकर्‍यांच्या खात्यात रूपयाही जमा नाही!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शेतकर्‍यांचे पैसे जमा होणार म्हणून शेतकर्‍यांनी केवायसी, करावी असा डिंडोरा महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पिटला होता. आता केवीयसी करून एक महिना झाला तरी शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाईचा एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे पसिरातील शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ऐन पेरणीच्या काळात सरकारकडून बळीराजाची थट्टा!

खरीप आणि रब्बी हंगामात कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने दांडी मारल्याने सन २०२३ मध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. रब्बी हंगामात हरबरा पेरणीनंतर वातावरणात बदलाव निर्माण झाला. शेतात आलेल्या पिकावर करपा आला, आणि हरबरा पिकात रोटाहोटर टाकून पीक काढावे लागले. पुन्हा गहू आणि हरभरा पेरावा लागला. सोयाबीन पिकांचेही तसेच झाले. अल्प पावसामुळे उत्पादन घटले. मूग, उडीद पीक आलेच नाही. शेतकर्‍यांनी पीकविमा काढला. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पीकविम्याचे पैसे मिळाले नाही. शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी शेतावर जाऊन पंचनामे केले. अहवाल शासनाला पाठविला. परंतु, नुकसान भरपाईची प्रतीक्षाच करावी लागली. निवडणूक काळात तत्काळ केवायसी करण्याचे आदेश येऊन धडकले. १५ मेपर्यंत केवायसी ज्यांनी केली त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल. परंतु, एक महिना संपला तरीही पैसे जमा न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये खदखद व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात शेतकरी बी-बियाणे, रसायनिक खते भरुन पेरणीसाठी सज्ज होत असतो. अगोदरच सोयाबीन व कपाशीला भाव न मिळाल्याने संपूर्ण शेती तोट्यात निघाली. मजुरीही शेतकर्‍यांना शिल्लक राहिली नाही. २०२४ मध्ये शेती कशी करावी, या विवंचनेत शेतकरी असून, शासनाने नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी. आणि, ज्यांनी पीकविमा काढला होता त्यांना पीकविम्याची रक्कम कंपनीने द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.


केवायसी करुन आज एक महिना झाला तरी शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. ही शेतकर्‍यांची थट्टा शासनाने थांबवावी.
– दिनकरराव खेडेकर, शेतकरी, अंत्रीखेडेकर

निवडणूक संपली; शेतकरीप्रश्नी रविकांत तुपकर पुन्हा मैदानात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!