BULDHANAHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsVidharbha

निवडणूक संपली; शेतकरीप्रश्नी रविकांत तुपकर पुन्हा मैदानात!

– पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर तातडीने पीकविमा जमा करा – रविकांत तुपकर

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पीकविमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्यापही पीकविमा रक्कम जमा झालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर तातडीने ही रक्कम जमा करण्याबाबत पीकविमा कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. दि.१२ जूनरोजी मुंबई येथे मंत्रालयात तुपकरांनी कृषिमंत्री मुंडेंची भेट घेतली. नवीन खरीप हंगाम आला तरी मागील खरीप हंगामाचा पीकविमा शेतकर्‍यांना मिळाला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचेही तुपकरांनी त्यांना सांगितले.

राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परंतु असे असले तरी गतवर्षीचा पात्र शेतकर्‍यांना अद्यापही पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पीकविमा मंजूर असलेल्या ८५ हजारपेक्षा जास्त शेतकर्‍यांना पीकविम्याची प्रतीक्षा लागून आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर तातडीने पीकविमा जमा करण्याचे आदेश पीकविमा कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी तुपकरांनी ना. मुंडे यांच्याकडे केली आहे. तसेच सध्या राज्यभरातील शेतकरी खते आणि बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहे. या पार्श्वभूमीवर खते, बी- बियाण्यांचा राज्यामध्ये होणारा तुटवडा, बोगस खतांची विक्री व लिंकिंगच्या माध्यमातून अतिरिक्त खते शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा प्रकार तातडीने थांबविण्यासंदर्भात कृषी विभागाला सूचना देण्याची मागणीसुद्धा त्यांना केली आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेडनेट उत्पादक शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा चढवण्याचा घाट कृषी विभागाने घातला आहे. हा घाट तातडीने थांबवण्यासंदर्भात ही विनंती तुपकरांनी केली. त्यावर कृषिमंत्री मुंडे यांनी तातडीने बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांना शेतकर्‍यांवर होणारी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहे. याप्रसंगी इसरूळचे सरपंच सतीश पाटील-भुतेकर, श्याम पाटील-भुतेकर, भिकणराव भुतेकर व प्रदीप सोळंकी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!