Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची चिंता वाढली; अजित पवार, शिंदे गटाचा फायदा नाही?; स्वबळावर लढण्याचा सूर!

– ‘महायुती’ला फक्त १२८ मतदारसंघात अनुकूल वातावरण!
– भाजपला साथ दिल्याने मराठा मतांसह दलित व मुस्लीम मतांनी अजित पवारांकडे फिरवली पाठ!

मुंबई (खास प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये अंतर्गत मंथन सुरू असून, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊन विधानसभेला सामोरे गेलोत तर नुकसान होऊ शकते, असा एक सूर भाजपात उमटू लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणानुसार, १५०हून अधिक विधानसभा मतदारसंघात महाआघाडीला मताधिक्क्य असून, १२८ मतदारसंघात महायुतीला चांगली मते मिळालेली आहेत. तसेच, दलित व मुस्लीम मते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, असा अंदाज होता. परंतु, हा अंदाज फोल ठरला आहे. जेथे शिंदे सेनेचे खासदार निवडून आलेत, तेथे भाजप आमदारांच्या मतदारसंघातील मतांचा त्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे शिंदे सेनेला मूळ शिवसेनेची मते मिळतील, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. परिणामी, स्वबळावर लढून बहुरंगी लढती झाल्या तर भाजपला फायदा होईल, असा सूर सद्या भाजपात उमटत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अगदी गावपातळीवर पक्ष संघटना बांधणीसाठी सरकारमधून ‘मला मोकळे करा’, अशी भाजपच्या नेतृत्वाकडे मागणी केली असून, ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भाजपला आणखी तळागाळात पोहोचवण्यात फडणवीस यांना यश येईल.

Maha News | Mahayuti alliance faces tough contests in the final phase of  Maharashtra polls - Hindustan Timesलोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘४५ पार’चा नारा दिला होता. या निवडणुकीत ‘मोदी फॅक्टर’ चालेल, असा भाजपचा अंदाज होता. परंतु, राज्यातून मोदी लाट केव्हाचीच हद्दपार झाली असल्याचे प्रत्यक्ष निकालातून दिसून आले. कारण, जेथे मोदींनी सभा घेतल्या तेथीलच उमेदवार पडले. भाजपला कशाबशा ९ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभेला कसे सामोरे जावे, याचे मंथन सद्या भाजपमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत १५०पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्क्य मिळालेले आहे. तर भाजप व महायुतीला फक्त १२८ विधानसभा मतदारसंघात अनुकूल मते पडलेली आहेत. महाआघाडीला मराठा, दलित, आणि मुस्लीम मते सर्वाधिक मिळाली. ओबीसी वर्ग तर या राजकीय पक्षांचा परंपरागत मतदार आहेच. ओबीसी मतांवर भिस्त ठेवल्याने महायुतीला फक्त १७ जागाच जिंकता आल्यात. त्यातच धक्कादायक बाब अशी, की मूळ शिवसेनेची मते शिंदे सेनेला घेता आली नाहीत. त्याचे सात खासदार निवडून आले असले तरी, भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघातून लीड मिळाल्यामुळेच हे खासदार निवडून येऊ शकलेत. जसे की, बुलढाण्यात शिंदे सेनेचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे फक्त २९ हजार मतांच्या फरकाने निवडून आलेत. त्यांना जळगाव जामोद, व खामगाव या मतदारसंघातून लीड मिळाल्यामुळेच ते विजयी होऊ शकले. या मतदारसंघात संजय कुटे व आकाश फुंडकर हे भाजपचे आमदार आहेत. अशीच परिस्थिती राज्यात चोहीकडे शिंदे सेनेची झालेली आहे.भाजपच्या आमदारांमुळेच शिंदे सेनेला सात जागा मिळाल्या. त्यामुळे शिंदे सेनेच्या मतांचा भाजपच्या उमेदवारांना या लोकसभा निवडणुकीत कुठे फायदा झालेली नाही. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दलित व मुस्लीम मतदारांसह मराठा मतदारांनीही पाठ फिरवली. त्यामुळे त्यांचा कसाबसा एक खासदार निवडून येऊ शकला. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपला काही फायदा तर झाला नाहीच, उलट भाजपला राजकीय तोटा सहन करावा लागला. या दोघांना सोबत घेतल्यानेच राज्यातून मोदी लाट संपली.

आता विधानसभेच्या २८८ जागांपैकी अजित पवार व एकनाथ शिंदे हे प्रत्येकी ८० जागांची मागणी करणार आहेत. त्यांना वाटाघाटी करून ७०-७० जागा जरी सोडल्या, तरी भाजपच्या वाट्याला १४८ जागा उरतात. त्यापैकी १००चा आकडा पार करणेही भाजपला विधानसभा निवडणुकीत अवघड जाणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात ‘गद्दार’ म्हणून महाविकास आघाडीकडून प्रचार होणार आहे. त्याला उत्तर द्यायला गेले तर भाजपविरोधाच्या नकारात्मक वातावरणात आणखी भर पडेल. शिवाय, अजित पवार यांच्या उमेदवारांना दलित, मुस्लीम व मराठा मतदार मते देण्याची काहीही शाश्वती नाही. शिवाय, ‘सहकार लॉबी’ आजही शरद पवार यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे अजित पवार यांचाही भाजपला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही, झाला तर उलट तोटाच आहे. त्यामुळे तिघांनीही स्वतंत्र लढले तर बहुरंगी लढतीत, अजित पवार व भाजपला फायदा होऊ शकतो. तर शिंदे गटाला नुकसान होऊ शकते, असे भाजपमधील एका गटाचे मत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून पराभवानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप काय राजकीय रणनीती आखते? याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!