शेतजमिनीच्या ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर नाव दिसण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला अटक
चाकण (विशेष प्रतिनिधी) – वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर वारसाचे नाव दिसण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गाव कामगार तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वासुली (ता.खेड) तलाठी कार्यालयात अटक करण्यात आली आहे. 29 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून गाव कामगार तलाठी सतिश संपतराव पवार (वय.५२ वर्ष ) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे, की तक्रारदार यांचे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसत नसलेने त्यांचे ऑनलाईन नाव दिसणेकरीता वासुली तलाठी कार्यालय येथील तलाठी लोकसेवक सतिश पवार यांची भेट घेतली असता, लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता,(दि. १७/५ ) रोजी लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडे वडीलोपार्जीत शेतजमीनीचा ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर त्यांचे नाव दिसण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच मागणी करुन, (दि. १०/०६/२०२४ ) रोजी लोकसेवक सतिश पवार यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये २० हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारताना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.