BuldanaBULDHANAVidharbhaWomen's World

महिला शक्तीही ठरणार निर्णायक!; लोकसभा निवडणुकीत तब्बल 8 लाख 46 हजार महिला मतदार!

बुलढाणा (संजय निकाळजे) – अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. लोकसभेच्या मतदारांमध्ये आठ लाख ४६ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश असल्याने महिला शक्तीचे मतदानदेखील निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, आज प्रचार संपला असून, आजची रात्र व उद्याचा दिवस-रात्र महत्वाची ठरणार आहे. तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

Women voters in Indian democracy: A silent revolutionमहिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. महिला मतदारांची संख्या वाढविणे हे या अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. त्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट ,अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येते. शिवाय, उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला संस्कृती या विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदान नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषामागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषामागे ८७९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये एक हजार पुरुषामागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये एक हजार पुरुषामागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. म्हणजेच २००४,२००९,२०१४ आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून वीस लाख ५५ हजार ८१९ मतदार आहेत. त्यात मलकापूर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभेमध्ये गेल्याने मलकापूर आणि नांदुरा मधील दोन लाख ७९ हजार ५३७ मतदार वगळता सहा विधानसभा मतदारसंघ मिळून बुलढाणा लोकसभेसाठी १७ लाख ७६ हजार २८२ मतदारांमध्ये नऊ लाख २९ हजार ८५८ पुरुष आणि आठ लाख ४६ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश आहे. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात एक लाख ४१ हजार ९६८ महिला मतदार आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात जळगाव जामोद व संग्रामपूर तसेच शेगावातील काही गावांचा अंतर्भाव असून, एक लाख ३९ हजार २२५ महिला मतदार आहेत. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये एक लाख ४८ हजार ८६६ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात एक लाख ३९ हजार ७११ महिला मतदार आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघात एक लाख ४० हजार २१२ महिला मतदार आहेत. त्याचप्रमाणे खामगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये खामगाव आणि शेगाव दोन्ही तालुके मिळून एक लाख छत्तीस हजार ४१८ महिला मतदारांचा समावेश आहे. अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघामधून बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आठ लाख ४६ हजार ४०० महिला मतदारांचा समावेश असून, त्यांची शक्ती देखील लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे भवितव्य ठरविण्यासाठी निर्णय ठरणार आहे. उपरोक्त महिला मतदारांमध्ये किती महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावतील हे मात्र गुलबत्यात असून त्याची खरी प्रचिती येणारा काळच ठरवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!