संतांचा साधेपणा : भक्तांच्या पंगतीला बसून घेतला शिगोरी आमटी-भाकरीचा आस्वाद!
– भगवानगडाच्या घोगस पारगांव येथील नारळी सप्ताहाला जोरदार प्रतिसाद
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – घोगस पारगांव येथे सध्या श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेला ९० वा नारळी सप्ताह मोठ्या थाटात सुरू आहे. या वैभवशाली सप्ताहात ऐश्वर्यसंपन्न भगवानगडाचे महंत ह.भ.प.न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी सप्ताहातील भोजन मंडपात अगदी पंगतीत बसून साध्या पत्रावळीवर शिंगोरी आमटी व भाकरीचे जेवण करून श्री संत भगवानबाबांच्या आठवणीला उजाळा देत असल्याचे एक विलोभणीय दर्शन भाविकांनी प्रत्यक्ष अनुभवले. यावेळी भगवानगडावरील प्रधानाचार्य ह.भ.प.नारायण महाराज शास्त्री (स्वामीजी) यांनीही बाबांच्या शेजारी बसून घोगस पारगावकरांनी मोठ्या प्रेमाने बनवलेल्या प्रसादाचा आस्वाद घेतला. जेव्हा ऐश्वर्यसंपन्न भगवानगडाचे महंत पुढारलेल्या जमान्यातदेखील आपली संस्कृती आणि वारसा समर्थपणे सांभाळतात, तेव्हा साहजिकच मस्तक झुकल्याशिवाय राहत नाही.
श्री संत भगवानबाबांनी नारायणगडाची १४ वर्षे यशस्वीपणे गादी सांभाळली. परंतु तरीही ईश्वराची इच्छा झाली आणि श्री क्षेत्र भगवानगडाची निर्मिती झाली. भगवानगडाच्या स्थापनेपासून ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांनी पारमार्थिक ऐश्वर्याबरोबर भौतिक ऐश्वर्याची पताका फडकावली, ऐश्वर्यसंपन्न असूनदेखील जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव याप्रमाणे ते अनुकरण करत होते. साध्याला साधे तर श्रीमंताबरोबर आपल्या दुहेरी श्रीमंतीचे दर्शन घडवून देत होते. घोडा तांग्याचा प्रवासदेखील सुखकर व्हावा यासाठी तांग्याच्या चाकांनाही जीपगाडीचे चाके वापरण्याची संकल्पना ही श्री संत भगवान बाबांच्या ऐश्वर्यशाली जीवनशैलीची एक साक्ष ठरते. घोड्याचा तांगा, पांढरे शुभ्र वस्त्र, केशरी फेटा, कपाळी गोपिचंद-अष्टगंधाचे हे तेजस्वी वैभव होते, मात्र एवढे वैभव असले तरी आपण साधेपणादेखील सोडला नसल्याचे ते दाखवून देत होते. राजवैभवात गडाचा हा राजा आपले धर्मकार्याचे रत्नजडीत सिंहासनावरून धर्मध्वजा फडकवत होता. त्यांचे पश्चात द्वितीय महंत संत भीमसिंह महाराज यांनीदेखील या वैभवात भर घालून गडाची धुरा, संस्कृती व वारसा चालवण्याचे काम करत गडाचा नावलौकिक दूरवर नेला. गुरुवर्य भीमसिंह बाबांनीदेखील ऐश्वर्याबरोबर संस्कृती व परंपरा अबाधित ठेवली. आता तर ज्ञान आणि विज्ञान सोबतीला घेऊन या गडाची संस्कृती व परंपरा सातासमुद्रापार नेण्याचे काम विद्यमान महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री बाबा हे करत आहेत. अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगत ग्रंथराज ज्ञानेश्वरीमय जीवन समाजाप्रती समर्पित केले आहे. भगवानगडाच्या वैभवा बरोबरच गडाचा साधेपणादेखील त्यांच्याकडून अनुभवास येत आहे. श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी साप्ताहात शिंगोरी आमटी बनवण्यासाठी संपूर्ण शिंगोरीचे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात. या नारळी सप्तहास दररोज लाखो भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दिवसेनदिवस गर्दी वाढत आहे. आलेल्या भाविकांना चोवीस तास महाप्रसाद दिला जात आहे. त्यासाठी भगवानगड परिसरातील गावातून दररोज भाकरी, लोणचं, ग्रामस्थ घेवून येत आहेत.