चिखली तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा धुमाकूळ; अंगावर वीज कोसळून वृद्ध ठार; शेतकरी महिला गंभीर जखमी!
– मेरा परिसरात गारपीट, शाळेची पत्रे उडाली, वीज पुरवठा विस्कळीत
– चिखली तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस, वादळ अन गारपिटीचा धुमाकूळ!
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील काही भागात आज पुन्हा एकदा वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच, शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने ७०वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल घडली. बापूराव किसन हिवाळे (वय ७०) रा. शिरपूर असे त्यांचे नाव असून, सोनेवाडी शिवारातील शेतात ते काम करत होते. तसेच, चिखली तालुक्याला आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वार्यासह गारपिटीने पुन्हा एकदा झोडपून काढले. मेरा परिसरातील शेतकरी महिला विजेच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली असून, शाळेवरील टीनपत्रे उडाली आहेत. झाडे व विद्युत पोल कोसळल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
कालपासून चिखली तालुक्यात पाऊस व गारपीट होत आहे. काल दुपारी चार वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला, त्यानंतर वादळी वार्यासह विजांचा कडकडाट झाला व वीज बापूराव हिवाळे यांच्या अंगावर कोसळली. या घटनेने शिरपूर गावात हळहळ व्यक्त होत होती. या दुर्देवी घटनेची माहिती कळताच, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शेख राजीक, पोलीस कॉन्स्टेबल आशीष काकडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा येथे नेण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. या वयोवृद्ध शेतकर्यावर अस्मानी संकट कोसळल्यामुळे त्यांच्या परिवारार दुःखचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, आजदेखील तालुक्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्यासह पाऊस झाला. मेरा बु. येथील अल्पभूधारक शेतकरी महिला अन्नपूर्णा कोंडूबा शेळके (वय ६५) यांचे गावालगत गट नंबर ७८० मध्ये कोरडवाहू दोन एकर जमीन आहे. या जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने त्यांनी जोडधंदा म्हणून, दोन म्हशी घेवून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. या म्हशींना चारापाणी करण्यासाठी त्या गेल्या असता, अचानक दुपारच्या सुमारास वादळी वार्यासह गारपीट सुरू झाली. त्यामध्ये महिलेच्या अंगावर वीज पडली आणि महिला बेशुध्द होऊन जमिनीवर पडली. हा प्रकार शेजारी असलेल्या पवण पडघान हा धावत आला आणि सदर प्रकार पाहून त्यांचा मुलगा भगवान शेळके यांना फोन लावून बोलावले. चार ते पाच जणांनी तात्काळ डॉ. जहीर पटेल येथे आणले. डॉक्टरांनी गंभीर जखमी पाहून चिखली येथील डॉ. सावजी यांच्या दवाखान्यात पाठविले. त्याठिकाणी महिलेवर उपचार सुरू आहेत. तसेच बोरगाव वसू येथील जिल्हा परिषद शाळेवरील टीनपत्रे उडाले असून, परिसरात ठिकठीकाणी विद्युत पोल, मोठ मोठी झाडे पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
तालुक्यातील बोरगांव बसु येथे पाऊस व चक्रीवादळाने घरावरील पत्रे शेतातील टीनशेडचे पत्रे उडाली होती. त्याची पाहणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी आर. आय. शेळके, पंचायत समितीचे कर्मचारी सालके साहेब व इतरांसह सरपंच अनिता माने, ग्रामपंचायत सदस्य हरसिंग छरै, संजय सपकाळ, पोलिस पाटील आदींनी केली. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.