ChikhaliHead linesVidharbha

साईडपट्ट्या न भरल्याने मेरा ते अंत्री खेडेकर रोडवर भीषण अपघात; एकजण गंभीर जखमी

– ठेकेदार व बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना किती बळी घ्यायचे आहे?; ग्रामस्थ आक्रमक

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मेरा ते अंत्री खेडेकर रोडच्या साईडपट्ट्या न भरल्या गेल्यामुळे दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला असून, वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. भरधाव टिप्परने या दुचाकीस्वाराला मागच्या बाजूने उडवले होते. विशेष म्हणजे, या साईडपट्ट्या तातडीने भरल्या जाव्यात, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेळोवेळी आवाज उठवला आहे. तरीदेखील गेंड्याची कातडी पांघरलेला ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साईडपट्ट्या भरत नसल्याने या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत सहा ते सात जीवघेणे अपघात झाले असून, कुणाचा जीव जाण्याची वाट हा ठेकेदार पाहात आहे का, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. जखमी दुचाकीस्वारावर चिखली येथे वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील मौजे मेरा ते अंत्रीखेडेकर या रोडवर राहुल गजानन झिने (वय २९, रा. बोरखेडी, ता.जाफराबाद, जि. जालना) हा तरूण आपल्या दुचाकीवरून बोरखेडी येथून मेहकरला लग्नासाठी जात होता. अंत्रीखेडेकर ते मेरा या रोडवर भागवत अचितराव माळेकर यांच्या गोठ्यासमोर मोठ्या टिप्पर गाडीने राहुल झिने याला पाठीमागच्या बाजूने ठोकर दिली. यामध्ये राहुल झिने हा दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून गावातील भागवत माळेकर व सुज्ञ व्यक्तींनी तातडीने अंत्रीखेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्याला हलवले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्यात आले होते. टिप्पर गाडीला ओव्हरटेक करून पुढे जात असताना जागा नसल्यामुळे व साईडपट्ट्या भरलेल्या नसल्यामुळे या दुचाकीला टिप्परची धडक बसली, असल्याचे सांगण्यात येते. या रस्त्याचे काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने काम केले होते. परंतु, त्याने साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सडेतोड वृत्तदेखील प्रकाशित केलेले आहे. तरीदेखील ठेकेदार व बांधकाम खात्याचे अधिकारी जागे झालेले नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारदेखील केलेली आहे, परंतु त्याचीसुद्धा शासकीय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या रोडवर यापूर्वीसुद्धा तीन ते चार जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या बळींना सुद्धा ठेकेदार जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांचे संगनमत असून, ते आणखी किती जणांचा बळी घेणार घेणार आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
————

मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम धोकादायक; दुचाकीस्वारांच्या जीवावर उठले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!