पुन्हा पंतप्रधान झाल्यावर संविधान बदलणार की नाही? हे मोदींनी आधी स्पष्ट करावे!
– मोदींची ही शेवटची निवडणूक; मोदी देशाला फसवित असून, ते सर्वात मोठा जुमला आहे!
– चिखली येथे आंबेडकरांची जाहीर सभा; कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह
चिखली (संजय निकाळजे/महेंद्र हिवाळे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठा जुमला असून, ते देशाला फसवित आहेत. पुन्हा पंतप्रधान झाल्यावर देशाचे संविधान बदलणार की नाही, हे मोदींनी स्पष्ट करावे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व मोदींना चिखली येथील जाहीर सभेतून ठणकावले. संविधान बदलणार नाही, याबाबत मोदी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत तो आपल्याला फसवतोय. भाजप सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी व गोरगरीब, कष्टकरी, शेतकर्यांचे सरकार आणण्यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी याप्रसंगी केले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारार्थ चिखली येथील राजा टावर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी आंबेडकरांनी रोखठोक शब्दांत आपली भूमिका मांडली. याप्रसंगी मंचावर उमेदवार वसंतराव मगर, वंचित आघाडीचे नेते अशोक सोनवणे, जिल्हा प्रभारी ध्यैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखेडे, प्रचारप्रमुख परशुराम बोराळे, शरद वसतकार, मनोज निकाळजे, जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, राज्य उपाध्यक्षा सविताताई मुंडे, महिला अध्यक्षा सावंतताई, तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, चिखली शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांच्यासह जेष्ठ नेते उपस्थित होते.
आंबेडकर पुढे म्हणाले, की देशातील लोकसभा निवडणूक ही महत्वाच्या टप्प्यावर येवून ठेपली असून, समान व्यवस्थेचे आवाहन देशापुढे उभे ठाकले आहे. या देशात पुढे काय काय घडणार आहे हे निश्चित सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात अगदी बेंबीच्या देठापासून बाबासाहेब पुन्हा आले तरी या देशाचे संविधान बदलणार नाही, असा प्रचार करताहेत. मोदी स्वत:सह आपल्याला फसवत असून मोदीने हा जुमला केला आहे. संविधान बदलण्याचा आरोप मोदी व आरएसएसवर केला जात असून, बाबासाहेब येणारच नाही तर ते बदलणार कुठून? परंतु, मोदी संविधाना हात घालू शकतात, त्यामुळे जनतेने मोदींच्या बोलण्याला फसू नये. गल्लीतला दादा आणि दिल्लीतला दादा यात फरक काय? तर या देशाला माणुसकी जपणारा पंतप्रधान हवा आहे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
जगातला व देशामधील सर्वात मोठा भ्रष्टाचार इलेक्ट्रॉल बॉण्ड!
आंबेडकर यांनी मोदी सरकारचे सर्व खोटे नाटे व नाटकी स्वरुपाचे सोंग उघड केले. श्रीमंत हिंदूला व्यवसाय करण्यासाठी त्याला कशा पध्दतीने जाळ्यात अडकवून त्याच्याकडून एखाद्या गल्लीतल्या गुंड्यासारखे खंडणी मागण्याचा प्रकार मोदी करीत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. देशातील मोठ्या व्यापार्यांना ई.डी.चा धसका दाखवून त्यांच्याकडून १३ हजार करोड रुपयांची खंडणी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मोदी सरकारने वसूल केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. एकीकडे गरिबी, बेरोजगारी वाढत असतांना मोदी सरकार मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारचे गल्लीतल्या वसुलीदादासारखे वागत आहे, असे ते म्हणाले. जनतेचा प्रचंड उत्साह पाहून बुलढाणा मतदारसंघात वचित आघाडीचे वसंत राजाराम मगर हे प्रचंड बहुमताने विजय होतील, असा दावाही यावेळी आंबेडकरांनी केला. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचे संविधान बदलण्यात येणार असून, गोध्रा व मणिपूर प्रकरणात जे काही घडले ते भविष्यात मोदी सत्तेवर आल्यास देशात ते जागोजागी घडू शकते. तसेच पंतप्रधान मोदींची ही शेवटची निवडणूक असेल, असेही आंबेडकर म्हणाले.
———
चिखली 📍जिल्हा: बुलडाणा #VBAForIndia #VBA #prakashambedkar #chikhli#buldana #वंचित @VBAforIndia @Prksh_Ambedkar @eprabuddhbharat @JitratnPatait @NDhuldhwaj pic.twitter.com/ej81YUG8Rk
— Pavan S. Ingle (@PavanSIngle2) April 19, 2024