बालेकिल्ल्यात घुसून तुफान सभा!; ‘ठेकेदारी घरातच, देवस्थानं, मंदिरांच्या जमिनी हडपल्या; मेहकर मतदारसंघासोबतच जिल्ह्याचं वाटोळं केलं; प्रतापरावांवर घणाघाती टीका!!
– प्रचंड विक्रमी ठरली मेहकरतील सभा; प्रचार रॅलीही ठरली रेकॉर्डब्रेक!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – कमिशन राज, दादागिरी आणि एकाधिकारशाहीला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आता पेटून उठली आहे. जनशक्तीविरुद्ध धनशक्ती असा हा सामना आहे. प्रत्येक घटकातून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद पाहता या लढाईत विजय हा जनशक्तीचाच होणार आहे. आता एकजूट होऊन दादागिरी कमिशनराज संपवून जनसामान्यांचा आवाज बुलंद करू, असे आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मेहकर येथील विराट सभेत केले. मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर मतदारसंघात घुसून तुपकर हे रेकॉर्डब्रेक सभा तर घेतच आहेत; परंतु अगदी घरात घुसून प्रतापरावांवर जहरी टीका करत आहेत. ठेकेदारी घरातच, देवस्थानं, मंदिरांच्या व इतरांच्या जमिनी हडपल्या, मेहकर मतदारसंघच नाही तर त्यांनी जिल्ह्याचा वाटोळं केलं, अशा शब्दांत तुपकरांनी प्रतापरावांवर जहाल शब्दांत टीकास्त्र डागणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही दबावाला न जुमानता लोकांची प्रचंड गर्दी तुपकरांच्या सभांना होत आहे.
मेहकर शहरात अर्थात विद्यमान खासदारांच्या गडात आज, १९ एप्रिलरोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची रेकॉर्डब्रेक प्रचार रॅली निघाली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण अशा सर्वच समाज घटकातील नागरिक या प्रचार रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मेहकर शहरातील ही प्रचार रॅली आणि विक्रमी सभा निवडणूकाचा टर्निंग पॉईंट ठरणारी आहे. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, मेहकर आणि लोणारमध्ये गेली तीस वर्षे एक हाती सत्ता आहे. केंद्रात आणि राज्यातही यांची सत्ता आहे. परंतु सध्या बस स्थानकाचीदेखील सुधारणा हे करू शकले नाही. बसस्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृहदेखील नाही. अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आहे, सिंचनाचा अभाव आहे. एवढ्या वर्षात एखादी चांगली मोठी एमआयडीसी येथे सुरू होऊन युवकांना रोजगार मिळायला हवा होता, परंतु तसे काहीच झाले नाही. ठेकेदारी घरातच, देवस्थानांच्या, मंदिरांच्या व इतरांच्या जमिनीही त्यांनी हडप केल्या. पंधरा वर्षात मेहकर मतदारसंघात सोबतच संपूर्ण जिल्ह्याचे वाटोळा करण्याचं काम यांनी केले आहे. आमच्यावर शेकडो केसेस केल्या, पोलिसांना लाठीमार करायला लावला, आम्हाला तुरुंगात टाकले, रविकांत तुपकर गुन्हेगार आहे म्हणून वर्षभर त्याला तुरुंगात ठेवावे, अशी मागणी केली, परंतु आमची चूक तरी काय आहे. सोयाबीन-कापसाला भाव मागणे, पीकविमा मागणे, नुकसान भरपाई मागणे, तरुणांना रोजगार मागणे, महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी करणे, सर्वसामान्यांसाठी लढणे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणे हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या संघर्षाची मजुरी म्हणून एक मत द्या, असे आवाहन केले.
मी कोणत्याही पदावर नसतांना केवळ आंदोलनाच्या बळावर शेतकर्यांना न्याय मिळवून दिला. तुमच्या सर्वांचे आशीर्वादाने जर संसदेत गेलो तर सोयाबीन-कापसाच्या भावासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संपूर्ण ताकदीने लढेल. ही लढाई एकटी रविकांत तुपकरची नाही तर ही लढाई आता सर्वसामान्य जनतेची आहे. रविकांत तुपकर खासदार म्हणजे प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि प्रत्येक फटका माणूस खासदार होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः निवडणुकीला उभे आहात असे समजून प्रचाराचे काम करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. आता प्रत्येकाच्या मनामनात परिवर्तनाचा विचार आहे, घरची चटणी भाकर खाऊन या जिल्ह्यात परिवर्तनाची क्रांती घडवून दाखवू, असा विश्वास यावेळी उपस्थित त्यांनी प्रचंड नारेबाजीच्या माध्यमातून रविकांत तुपकारांना दिला.