योद्धा जेव्हा शरण येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो!
– तुपकर हे दीड लाखाच्या फरकाने विजयी होण्याची चिन्हे दिसताच विरोधक हादरले!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते तथा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तब्बल दीड लाखाच्या फरकाने निवडून येण्याची चिन्हे निर्माण होताच, त्यांचे विरोधक मुळासकट हादरले आहेत. त्यामुळेच शेवटच्या टप्प्यात तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर वैयक्तिक बदनामीचे हल्ले चढविणे, आणि चिखलफेक करण्याची रणनीती विरोधकांनी आखली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. त्यासाठी काही फेक व्हिडिओज आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यात आल्याचेही विश्वासनीय सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. शेवटच्या दिवसांत तुपकरांविरोधात हे सोशल मीडिया बॉम्ब फोडले जाणार असल्याचेही हे सूत्र म्हणाले. जिल्हाभरात तुपकरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, जिल्हावासीय लोकवर्गणी जमा करून तुपकरांना ‘व्होट आणि नोट’ देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. एका वरिष्ठ व अभ्यासू नेत्याने सांगितले, की ‘यावेळेस मतदानाचा टक्का वाढणार असून, तो तुपकरांच्या फायद्याचा ठरणार आहे. चौरंगी लढतीत तुपकर हे किमान चार ते साडेचार लाख मते घेतील’, अशी शक्यता या नेत्याने खासगीत बोलताना व्यक्त केली. तुपकरांच्या खात्रीशीर विजयाची कुणकुण लागल्यानेच सद्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच “योद्धा जेव्हा शरण येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो”, या तत्वाप्रमाणे तुपकरांवर चिखलफेकीचे उद्योग आता विरोधक करणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे.
गाडे प्रकरणात आमचा कसला ही संबंध नसताना बदनामीचे षडयंत्र विरोधक रचत आहेत. पण त्यांना एकच सांगतो जेव्हा योद्धाला रणांगणात हरवता येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो. त्यामुळे तुमचे या षडयंत्रला जनता बळी पडणार नाही… pic.twitter.com/fPKfafplds
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) April 20, 2024
शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या मेहकरमध्येच रविकांत तुपकरांनी तुफान अशी विक्रमी गर्दीची सभा घेतल्यानंतर विरोधक कमालीचे संतप्त झालेले दिसून येत आहेत. तुपकरांच्या प्रचाराचा झंजावात आणि त्यांच्या सभेला विराट स्वरुपात सर्वत्रच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, ही माणसे भाड्याने आणलेली नाहीत. स्वतःची चटणी-भाकरी खाऊन ही माणसे सभेला येत आहेत, आणि स्वतःच्याच जवळचा पै-पैसा तुपकरांच्या झोळीत टाकत आहेत. तुपकरांना मिळणार्या लोकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच विरोधकांना आपला दारूण पराभव दिसून आलेला आहे. तसेच, तुपकरांना विरोध करण्यासारखा एकही मुद्दा नसल्याने, परिणामी ते आता रविकांत तुपकरांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करून चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत.चिखली येथे संतोष गाडे नावाच्या व्यापार्याने सर्वसामान्य शेतकर्यांचे १० कोटी रुपये लुटले आणि तो फरार झाला. सदर प्रकरण रविकांत तुपकर यांना समजताच ते नुकसानग्रस्त शेतकर्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटले व शेतकर्यांना फसवणार्या संतोष गाडे या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. तसेच या व्यापार्याला अटक करण्याची मागणीदेखील तुपकर यांनी त्यावेळी केली. तसेच शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिकादेखील पहिल्या दिवसापासून घेतली आहे व याप्रकरणी तुपकर व विनायक सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने सदर व्यापार्याच्या खाजगी मालमत्तेवर बोजा चढविला गेला आहे. या प्रकरणात आरोप करणार्यांनी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, हे विशेष. या गाडे प्रकरणात रविकांत तुपकर यांच्या पत्नी तथा अॅडव्होकेट शर्वरीताई तुपकर यांनी त्या व्यापार्याचे वकीलपत्र घेऊन त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, अशा आशयाची खोटी बदनामी आणि खोटे आरोप शर्वरीताई तुपकर यांच्यावर जाणूनबुजून केले जात आहेत. त्याबाबत एक बनावट व्हिडिओदेखील तयार करण्यात आला असून, तो व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओत एका वृत्तवाहिनीच्या नावाचादेखील वापर करण्यात आला असून, या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने आमची मूळ बातमी मोडूनतोडून आणि त्यात भलतेच काही घुसडवून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले असल्याने हा एक प्रकारे सायबर क्राईम विरोधकांनी केला असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. या फेक व्हिडिओच्या माध्यमातून विरोधक निवडणुकीच्या तोंडावर गाडे मुद्दा उकरून काढून रविकांत तुपकर यांची प्रतिमा मलीन करण्याचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. एवढेच नाही तर अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ व काही सोशल मीडिया पोस्ट विरोधकाने तयार केल्या असून, त्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात व्हायरल करून तुपकरांना बदनाम करण्याची रणनीतीदेखील विरोधकांनी आखली असल्याचे खात्रीशीर सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर या तुपकरांना मानणार्या वर्गासह सुज्ञ जिल्हावासीयांनी याबाबत विरोधकांचा डाव ओळखून सावध होण्याची गरज आहे.वास्तविक पाहाता, चिखलीतील प्रकरणात शेतकर्यांचे १० कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या गाडे या आरोपीचे सासरे हे प्रख्यात वकील अशोक सावजी यांच्याकडे कारकून म्हणून कामाला होते. आणि या संबंधापोटी एका व्यापार्याची केस आहे म्हणून अॅड.अशोक सावजी यांनी त्या कारकुनाच्या जावायाचे म्हणजेच संतोष गाडे यांचे वकीलपत्र घेतले. अॅड.सावजी यांनी वकीलपत्र घेतल्याचे समजताच रविकांत तुपकरांनी तात्काळ त्यांना संपर्क करून संतोष गाडे याचे वकीलपत्र घेऊ नये, आरोपी संतोष गाडे याने अपहार केलेला असून, हा पैसा गोरगरीब शेतकर्यांचा आहे. याची जाणीव अॅड. सावजी यांना करून दिली. सर्व हकिकत समजताच, त्याच दिवशी तत्काळ विधिज्ञ अॅड.अशोक सावजी यांनी आरोपी संतोष गाडे यांना मदत करण्यास व केस चालविण्यास नकार दिला. या प्रकरणामध्ये सौ.शर्वरी तुपकर यांचा काहीही संबंध नसला तरी विरोधक जाणुनबुजून त्यांचे नाव या गाडे प्रकरणात गोवताना दिसत आहेत. वास्तविक पाहता अॅड. अशोक सावजी यांनी गाडे या आरोपीचे वकीलपत्र नाकारल्यानंतर, त्याचे वकीलपत्र अॅड.व्ही.एन इंगळे यांनी घेतलेले आहे. सद्यस्थितीत हा खटला (क्रमांक २४१/ २०२३) न्यायप्रविष्ट आहे. तसेच या प्रकरणात बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयात व्यापारी संतोष गाडे यांच्यामार्फत जमीनअर्ज दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा दाखल क्रमांक ६७९/२०२३ असा आहे. सदर खटला संपलेला असून, यात अॅड. अजय दिनोदे यांचे वकीलपत्र आहे. ही सर्व खरी परिस्थिती मुद्दामहून झाकून ठेवून, विरोधक हे या प्रकरणात अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्यावर पर्यायाने रविकांत तुपकर यांच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ सामान्य जनतेची दिशाभूल करणे आणि शर्वरीताई तुपकर आणि रविकांत तुपकर या दाम्पत्याला बदनाम करण्याचे धादांत खोटे कुटील कारस्थान विरोधकांनी रचल्याचे दिसून येते. परंतु मतदारसंघातील जनता ही दूधखुळी नसून, आतापर्यंत तुपकर दाम्पत्याने शेतकर्यांच्या हितासाठीचा उभारलेला लढा शेतकरी, कष्टकरी जनता विसरलेली नाही. तुपकर दाम्पत्याच्या बदनामीचे रचलेले षडयंत्र विरोधकांवरच उलटणार असून, जिल्हावासीय तुपकरांच्या झोळीत भरभरून मते टाकतील, असा दृढविश्वास मतदार व्यक्त करत आहेत. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा तब्बल दीड लाखाच्या फरकाने विजय हा विरोधकांना जोरदार चपराक ठरणार आहे.