बिबी (ऋषी दंदाले) – दुसरबीड – बिबी रोडवर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात, दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर बिबी ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आज (दि.२०) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मृत झालेले दुचाकीस्वार हे जालना जिल्ह्यातील मानेगाव येथील रहिवासी असून, पोहेकर असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
सविस्तर असे, की जालना – मेहकर या वर्दळीच्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुसरबीड रोडवरील सावित्रीबाई मंगल कार्यालयासमोर एसटी बसने (क्रमांक एमएच २० बीएल २६१०) दुचाकी (एमएच २८ बीपी १९३३) ला जोरदार धडक दिली. समोरासमोर बसलेल्या या जोरदार धडकेने दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला होता. बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना असल्या कारणाने बिबी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी हे तातडीने घटनास्थळी धावले व त्यांनी मयत व्यक्ती व गंभीर जखमी व्यक्तीस उपचारासाठी बिबी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. या दुर्देवी घटनेचा पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी शिंदे, बोरे, सानप, जैवळ हे करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जालना डेपोची बस (क्र. एम. एच. २० बीएल २६१० ही जालन्यावरुन गडचिरोलीकडे जात होती व तर दुचाकी (क्र. एम. एच. २८ बीपी १९३३) ही दुचाकी बिबीकडून दुसरबीडकडे जात होती. दुचाकीवरील अरुण वामनराव पोहेकर, रा. मानेगाव खालसा, जि. जालना वय ६० वर्षे हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेले चिखली तालुक्यातील मुरादपूर येथील आश्रुबा गाडेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांचे कर्मचारी करीत आहेत.