BuldanaBULDHANAHead linesVidharbha

जिल्ह्यात आठवडाभरात पाच दिवस ‘ड्राय डे’!

– ‘ड्राय डे’च्या दिवशी दारूविक्री करताना आढळल्यास दुकानांचे लायसन्स रद्द अन कठोर कारवाई!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. यासाठी दि. 24 ते 26 एप्रिल आणि त्याआधी दि. 21 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आणि दि. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आठवड्यातील पाच दिवस जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञाप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच सोमवार, दि. १३ मे २०२४ रोजी रावेर मतदारसंघासाठी मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात मतदान होणार आहे. त्यासाठी दि. 11 ते 13 मे दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. ४ जून २०२४ रोजी होणार आहे. या दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे.

निवडणुका खुल्या, मुक्त, निर्भय, शांततेच्या वातावरणात, पार पाडण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती नमुना सीएल-२, सीएल-३, एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल, बीआर-२ आदी बंद ठेवणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१च्या कलम १३५ (सी), तसेच मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२ (१) नुसार तसेच त्या अंतर्गत केलेल्या विविध नियमानुसार मतदानासाठी तीन दिवस आणि मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येतील. दि. 24 एप्रिल रोजी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 5 वाजल्यापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ आणि मलकापूर, नांदुरा तालुक्यालगत पाच किलोमीटर परिसरातील सदर तालुक्यातील भाग येथे मद्य विक्री बंद राहिल. दि. 25 एप्रिल रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस आणि दि. 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहिल. तसेच मतमोजणीच्या दिवशी दि. 4 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहिल. बुलडाणा जिल्ह्यालगत रावेर, जालना, औरंगाबाद, मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर मतदारसंघासाठी दि. 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दि. 11 मे रोजी रावेर मतदारसंघात समाविष्ट मलकापूर आणि नांदुरा येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून मद्यविक्री बंद राहिल. तसेच मतदानपूर्वीचा दिवस आणि मतदानाचा दिवस दि. 12 आणि दि. 13 मे रोजी जिल्ह्यातील रावेर मतदारसंघालगत 5 किलोमीटर परिसरात जिल्ह्यातील भागात मद्यविक्री बंद राहणार आहे. सदर आदेशाची जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन करीत असल्यास त्यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ (१) (सी) नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


महावीर जयंतीला कत्तलखाने, मांसविक्री बंद

जिल्ह्यात रविवार, दि. 21 एप्रिल रोजी श्री महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे. निर्बंधाच्या कालावधीत मांसविक्री होणार नाही, याची दक्षता देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!