– भीमजयंतीची मिरवणूक, अन् मुख्यमंत्र्यांची सभा यामुळे पोलिसांवर होता अभूतपूर्व ताण
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – शांततेच्या वातावरणात पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला बुलढाणा शहरात काल रात्री गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचताना एका युवकाला चाकू मारण्यात आला असून, त्याला पोलिसांनी तातडीने दवाखान्यात नेले असताना, अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरील जयस्तंभ चौक परिसरात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर रोड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
बुलढाणा शहरातून १४ एप्रिलरोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीउत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक जयस्तंभ चौकात येत असताना आशुतोष पडघान याच्यावर अज्ञात आरोपींनी चाकूने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जखमी अवस्थेत त्याला बाजार रस्त्यावरून रुग्णालयात दाखल केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. परंतु, अतिरक्तस्त्रावाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आशूतोष पडघान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे, जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी कुणाल सुभाष निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
काल, महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुलढाण्यात सभा पार पडली. एक तर मुख्यमंत्री शिंदे हे तब्बल तीन तास उशिराने व हेलीकॉप्टरने आले. कार्यक्रमाला तब्बल साडेतीन तास उशीर झाल्याने बुलढाण्यातील त्यांचा मुक्काम वाढला होता. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण होता. या युवकाच्या हत्येच्या घटनेच्या पूर्वीच ते रात्री उशिरा कारने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. यावर कळस म्हणजे मिरवणुकीला रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे भरमिरवणुकीत चाकूहल्ला झाला तरी पोलिसांना फारसे काही करता आले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
———–