Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

सातार्‍यातून अखेर उदयनराजेंना भाजपची उमेदवारी!

– महायुतीतील सातारा, नाशिकच्या जागावाटपांचा तिढा सुटल्यात जमा!

सातारा (जिल्हा प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. सातार्‍याच्या जागेवर भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांनी दिल्लीदरबारी जोरदार हालचाली केल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांना अखेर उशिरा का होईना यश आले असून, भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उदयनराजे यांना ही निवडणूक फारसी सोपी नाही. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शशिकांत शिंदे यांचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे महायुतीचे उदयनराजेविरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी जोरदार लढत सातार्‍यात पाहायला मिळणार आहे.

सातार्‍यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सातार्‍यात जल्लोष सुरु केला होता. मात्र, तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकांच्या वेळी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरच लढले होते. २०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच उदयनराजे यांनी खासदारकी सोडली आणि राजीनामा देऊन भाजपात जाणे पसंत केले. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा शरद पवार पावसात भिजले आणि त्यांनी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना जिंकून द्या, असे आवाहन केले. २०१९ ला उमेदवारी देताना चूक झाली, असेही त्यांनी उदयनराजेंच्या बाबतीत म्हटले होते. त्यामुळे ही निवडणूक उदयनराजे हरले होते. उदयनराजेंच्या त्या पोटनिवडणुकीत ८७ हजार मतांनी पराभव झाला होता. आता भाजपने उदयनराजेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी उदयनराजेंना दिली आहे.
महायुतीत सातार्‍याच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करत होता. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम होता. नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर सातार्‍याची जागा भाजपला सोडू, अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. त्यामुळेच नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागादेखील जाहीर झाली नव्हती. मात्र, भाजपने सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयनराजे यांचे नाव जाहीर करण्याचे ठरवले होते. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आले आहे.


‘मला उमेदवारी मिळणारच होती, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत. तरुण, माता-भगिनींचं प्रेम यांची साथ मला मिळाली. मी पहिल्यांदाच सांगितले होते, की उमेदवारी मिळणार. कोण काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राबवणारे सरकार आहे.’ असे उदयनराजे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर सांगितले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!