बिबी (ऋषी दंदाले) – बिबी पोलिसांनी लोकसभा निवडणूक, मतदान व आगामी महत्वपूर्ण सण या पृष्ठभूमीवर शहरातून ‘रूटमार्च’ काढला. या रूटमार्चने समाजकंटकांच्या ऊरात चांगलीच धडकी भरली असावी, अशी चर्चा शहर व परिसरात सुरू होती. शहरातील मुख्य मार्गावरून हा रूटमार्च गेला.
लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडावी, आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी दि.१५ एप्रिलरोजी शहरातील मुख्य मार्गांवरून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूटमार्चला शहर पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य बाजारपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मुस्लिम गल्ली, मशीद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असे मार्गक्रमण करीत परत शहर पोलिस स्टेशनमध्ये रूटमार्च आला व समारोप करण्यात आला. या रूट मार्चमध्ये बिबी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक गजानन बास्टेवाड, केरळ पोलीस, बिबी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी, जवान आदी सहभागी झालेले होते.