पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – सततची नापिकी, उन्हाळ्यामुळे पाण्याअभावी शेतातील पीक जळून गेले, तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकर्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रुपनरवस्ती परिसरात घडली आहे. यामुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे. मल्हारी महादू रुपनर (वय 45, रा. रुपनरवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी रुपनर यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मल्हारी रुपनर हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मल्हारी रुपनर हे घरात दिसले नाही. त्यामुळे मल्हारी यांची पत्नी व मुलीने त्यांचा शोध घेतला असता, मल्हारी रुपनर हे बाथरूमच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मल्हारी रुपनर यांनी शेती करण्यासाठी सोसायटीचे व हात उसने स्वरूपात अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते. त्यांनी शेतात मेथी व कोथिंबीर लावली होती. मात्र, उन्हाळ्यामुळे शेतातील पीक जळून गेले होते.